‘पाकिस्तान कनेक्शन’ असे दोन शब्द लिहिले की, सर्वसामान्य माणसाच्या मनात अनाहूत भीती दाटून येते. भीती वाटली नाही तरी किमान टोकाच्या भावना तरी व्यक्त होतातच. पाकिस्तानशी असणारे एक चांगले ‘गोड’ कनेक्शन मराठवाडय़ात आहे! मिया नवाज शरीफ पंतप्रधान झाले आणि या गोडीत आता नवीच भर पडेल, असे साखर उद्योगातील सल्लागार अजय जोशी आवर्जून सांगतात. पाकिस्तानातील हबीब वकास ग्रुप ऑफ कंपनीज्चे अनेक साखर कारखाने आहेत. या कारखान्यांतील बॉयलर उभारण्याच्या कामात अजय जोशी सल्लागार म्हणून काम करतात. जोशी यांची अजय पॉलिमर नावाची फर्म आहे. या वर्षी चांगले पर्जन्यमान झाल्यास पाकिस्तानातील २० ते २२ साखर कारखान्यांबरोबर त्यांची कंपनी काम करू शकेल, पण त्यासाठी एकच अट आहे, भारत आणि पाकिस्तानातील राजकीय संबंध सुधारायला हवेत.
नव्यानेच पाकिस्तानातील निवडणुकांमध्ये नवाज शरीफ यांना यश मिळाल्यानंतर पाकिस्तानशी व्यावसायिक संबंध असणाऱ्या मराठवाडय़ातील उद्योजकांना नव्याने व्यवसाय पुनस्र्थापित करता येऊ शकेल, असा विश्वास वाटू लागला आहे. सन २००८ मध्ये अजय जोशी यांनी हबीब वकास ग्रुपच्या साखर कारखान्यांसाठी सल्लागार म्हणून काम केले. या कंपन्यांचा कारभार पाहणारे इलियास मेराज हे नवाज शरीफ यांचे जवळचे नातेवाईक आहेत. त्यांच्या साखर कारखान्यांसाठी जोशी यांनी पाकिस्तानचा दौराही केला. १६ ऑगस्ट २००८ रोजी ते पाकिस्तानला जाऊन आले, तेव्हा भारतीय सल्लागार म्हणून त्यांची शरीफ यांच्याशी ओळखही करून देण्यात आली. पाकिस्तानातील साखर उद्योगासाठी भारतीय तंत्रज्ञान व सल्लागारांची नियुक्ती होत आहे. विशेष म्हणजे या देशाला साखर आणि पोलादही मराठवाडय़ातून निर्यात केले जाते.
भारतीय वस्तू पाकिस्तानात जाताना मात्र आडवळणी प्रवास करतात. भारतीय वस्तू आधी दुबईला पाठविल्या जातात. त्यानंतर त्या पाकिस्तानात जातात. त्यामुळे वाहतुकीवर मोठा खर्च होतो. राजकीय हितसंबंध सुधारल्यास त्याचा थेट फायदा होऊ शकतो, असे अजय जोशी आवर्जून सांगतात. पोलाद निर्यात करणारे रांजणी (जिल्हा लातूर) येथील एन साईचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनाही पाकिस्तानशी व्यवसाय करण्याचा अनुभव चांगलाच आहे. एरवी पाकिस्तान कनेक्शन म्हटल्यावर ज्या भावना दाटून येतात त्या प्रत्येक वेळी सारख्या नसतात, हेदेखील जोशी व ठोंबरे यांचे निरीक्षण आहे.
पाकिस्तानात दिवंगत नेत्या बेनझीर भुत्तो यांचाही बहावल शुगर मिल हा उद्योग आहे. पाकिस्तानातील नेतेही साखरेच्या प्रेमात आहेत. मराठवाडय़ातील तज्ज्ञांनी ती गोडी टिकवून धरली आहे. नवाज शरीफ पंतप्रधान झाल्याने दोन्ही देशांतील संबंध सुधारतील आणि साखर उद्योगातील सहकार्याला नवा आयाम मिळेल, असा आशावाद जोशी व ठोंबरे बाळगून आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 16th May 2013 रोजी प्रकाशित
पाकच्या साखरेला ‘मराठवाडी’ आधार!
‘पाकिस्तान कनेक्शन’ असे दोन शब्द लिहिले की, सर्वसामान्य माणसाच्या मनात अनाहूत भीती दाटून येते. भीती वाटली नाही तरी किमान टोकाच्या भावना तरी व्यक्त होतातच. पाकिस्तानशी असणारे एक चांगले ‘गोड’ कनेक्शन मराठवाडय़ात आहे! मिया नवाज शरीफ पंतप्रधान झाले आणि या गोडीत आता नवीच भर पडेल, असे साखर उद्योगातील सल्लागार अजय जोशी आवर्जून सांगतात.
First published on: 16-05-2013 at 03:11 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay polymers the ajay joshi company in pakistan