Ajit Pawar Mocks Yugendra Pawar: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. शेवटच्या तीन दिवसांमध्ये उमेदवारांकडून मतदारसंघ पिंजून काढले जात आहेत. बारामतीमधील पवार विरुद्ध पवार सामना रंगात आला आहे. एकीकडे युगेंद्र पवार यांच्याबाजूने खुद्द शरद पवार व त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यादेखील प्रचारात दिसत असताना दुसरीकडे अजित पवार भावनिक होऊ नका अशी साद मतदारांना घालताना दिसत आहेत. आज सकाळी बारामतीमध्ये प्रचारादरम्यान अजित पवारांनी थेट प्रतिभाताई पवार यांचा उल्लेख करत त्यांना निवडणुकीनंतर प्रश्न विचारणार असल्याचं नमूद केलं.

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवारांनी यावेळी युगेंद्र पवारांना लक्ष्य केलं. युगेंद्र पवार आपल्याला मुलासारखे असून टीका-टिप्पणी करायची नसल्याचं ते म्हणाले. “मी समोरच्यावर टीका करायला गेलो, तर तो माझा पुतण्या आहेत. मला तो मुलासारखा आहे. पुन्हा आम्हीच आमच्या घरातल्यांवर एकमेकांवर टीका करतोय असं होईल. ते मला करायचं नाहीये. मी पुन्हा सांगतो की भावनिक होऊ नका”, असं अजित पवार म्हणाले.

“मी काकींना निवडणूक झाल्यावर विचारणा आहे की…”

“मला तुम्ही ९१ पासून आमदार-खासदार केलं. तेव्हापासून प्रतिभाताई कधी बाहेर आल्या आहेत का? आत्ताच का? काय नातवाचा पुळका आलाय माहिती नाही. जर मी खाताडा, पेताडा, गंजाडी असतो तर गोष्ट वेगळी. मी काकींना एकदा निवडणूक झाल्यानंतर विचारणार आहे की काय त्या नातवाचा एवढा पुळका आला होता तु्म्हाला. आत्ता विचारण्याची वेळ नाही”, अशी मिश्किल टिप्पणीही अजित पवारांनी यावेळी केली.

१६३ अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ देऊन रडीचा डाव, खासदार सुप्रिया सुळे यांची भाजपवर टीका

“आपल्या बारामतीत आपण एवढ्या निवडणुका लढवल्या, तरी असं काही आपण कधी केली नाही. काल मला कळलं की सभेला त्यांनी महिलांना ११ वाजता ५०० रुपये देऊन बसवलं होतं. २ वाजेपर्यंत त्या महिलांना चहा-पाणी काहीच नव्हतं. ही बारामतीमध्ये पद्धत नव्हती. आता सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. ठीक आहे. ज्यांच्याकडे पैसे आहेत, ते तसा खर्च करत आहेत”, असा दावा अजित पवारांनी यावेळी बोलताना केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कामं करायची तर नेतृत्वात धमक असावी लागते”

“माझी तुम्हाला विनंती आहे की पुढे हजारो कोटींची कामं करण्यासाठी नेतृत्वात ताकद असावी लागते. धमक असावी लागते. उद्या दुसरं कुणी निवडून आलं आणि एखाद्या कामासाठी अधिकाऱ्यांना फोन करावा लागला, तर अधिकाऱ्यांनीही प्रतिसाद दिला पाहिजे. त्यांना तो पोरखेळ वाटता कामा नये. या सगळ्याचा जनतेनं साकल्याने विचार करावा. आपल्याला फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा सोडायची नाही. मी ती कधीच सोडलेली नाही”, अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे युगेंद्र पवारांना लक्ष्य केलं.