Ajit Pawar महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर अखेर १८ जानेवारीला पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहरचं पालकमंत्रिपद असणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्हा आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांच्याकडून बीडचं पालकमंत्रिपद काढून घेण्यात आलं आहे. यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अजित पवारांना टोला लगावला आहे.

धनंजय मुंडेंकडून काढून घेण्यात आलं बीडचं पालकमंत्रिपद

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर बीड जिल्ह्यात चांगलंच राजकारण तापलं होतं. यावरून धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद देण्यास बीड जिल्ह्यातील आमदारांनी विरोध केला होता. त्यानंतर आता बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं आहे. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांना या पालकमंत्रिपदाच्या यादीतून वगळण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांना कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलेलं नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.

काय आहे सुषमा अंधारेंची पोस्ट?

काही अपवाद वगळता बीडचे पालकमंत्री कायम मुंडे घराण्यातील राहिलेत. मुंडेंचे पारंपरिक विरोधक पवारांच्या घराण्यातील अजितदादाकडे पालकमंत्री जाणे हा कोणता दैवी संकेत म्हणावा? असो, दादा आपले अभिनंदन अन् रक्तरंजित बीडमध्ये हरित बारामती पॅटर्न राबवण्यासाठी शुभेच्छा!

धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया काय?

“बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे. बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद अजित पवार यांना स्वीकारण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार त्यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले, याचा मला आनंद वाटतो. सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको, अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्री

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटात मोठी रस्सीखेच सुरु होती. भरत गोगावले यांनी रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळावं, यासाठी आग्रही होते. याबाबत त्यांनी अनेकदा अपेक्षाही बोलून दाखवल्या होत्या. मात्र, रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आली आहे.