Ajit Pawar on Rohit Pawar: शरद पवार यांचे मेहुणे प्रा. एन. डी. पाटील यांच्या नावाने असलेल्या संशोधन केंद्र आणि बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळा आज सांगली येथे पार पडला. या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील आणि आ. रोहित पवार, कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी नेते उपस्थित होते. अजित पवार यांनी आपल्या भाषणातून एन. डी. पाटील यांच्याशी संबंधित आठवणींना उजाळा दिला. तसेच रोहित पवार यांना मिश्किल टोला लगावला.

प्रा. एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील या शरद पवार यांच्या ज्येष्ठ भगिनी आणि अजित पवार यांच्या आत्या आहेत. आत्याबद्दल बोलत असताना अजित पवार काहीसे भावुक झालेले पाहायला मिळाले.

रोहितला घरी गेल्यावर बघतो…

अजित पवार भाषणात म्हणाले, “मी जन्माला आलो तसा आत्याला (सरोज पाटील) माई आत्या म्हणत आलो आहे. त्यामुळे आज मी त्यांना माईसाहेब, सरोज पाटील आणि माई वैगरे काही बोलणार नाही. मी मघाशी बघत होतो, तो रोहित सारखा माई माई करत होता. वास्तविक त्या त्याच्या आजी आहेत, तरी माई माई करतोय. ठिक आहे बघतो घरी गेल्यावर काय आहे ते…”

रोहित आता चुरूचुरू बोलायला लागलाय….

रोहित पवार यांच्या भाषणातील एका मुद्द्याचा संदर्भ देत अजित पवार यांनी रोहित पवार यांना चिमटाही काढला. “मी एनडी पाटील यांच्या संस्थेसाठी ४० लाखांचा निधी देत आहे. या निधीवर एक शून्य वाढवून चंद्रकांत पाटील यांनी निधी द्यावा”, असे रोहित पवार म्हणाले होते. यावर मिश्किलपणे बोलताना अजित पवार म्हणाले, बरं झाले रोहितने आमचे नाव घेऊन आणखी शून्य वाढवायला सांगितले नाहीत.

मी रोहितचे भाषण ऐकत होतो. खूप चुरूचुरू बोलायला लागला आहे, असे सांगून अजित पवारांनी स्वतःचे उदाहरण दिले. ते म्हणाले, “१९९० साली मी, जयंत पाटील, आर. आर. पाटील पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलो. १९९०, १९९५ आणि १९९९ असे तीन टर्म लागोपाठ निवडून आल्यानंतरही १९९९ च्या आघाडी सरकारच्या काळात आम्हाला फार स्पेस मिळाली नाही. २००४ साली थोडी संधी मिळाली. पण हल्ली काही काही जणांना पहिल्या टर्मलाच भाषणबाजी करायची असते. मी म्हणजे कुणीतरी मोठा अशा अर्विभावात ते दुसऱ्या पक्षालाही सल्ले देत फिरतात”

दोन दिवसांपूर्वीच रोहित पवार यांनी अजित पवारांच्या पक्षात कोकणातील नेत्याचे (सुनील तटकरे) चालत असून अजित पवारांचे पक्षावर नियंत्रण राहिले नसल्याची टीका केली होती. या टीकेला अजित पवारांनी या भाषणातून उत्तर दिले.

आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही

अजित पवार पुढे म्हणाले, एनडी पाटील यांना आम्ही लहानपणापासून मामा म्हणत होतो. एनडी मामांनी आयुष्यभर विचारांची कास धरली. मी लहान असताना आम्हाला मुंबईला जायला एकच घर होतं, ते म्हणजे विलेपार्ले पुर्व येथे असणारे मामांचे घर. माझ्या वडिलांनी त्यांच्या घराचा पत्ता तोंड पाठ करायला लावला होता. मघाशी चंद्रकांत पाटील म्हणाले, मी गिरणी कामगाराचा मुलगा छोट्याश्या घरात राहायचो. आम्हीही मुंबईत गेल्यावर मामांच्या दोन खोल्यांच्या घरात राहत होतो. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्मालो नाही. आता नंतर रोहितच्या वेळेस परिस्थिती बदलली. त्याच्या खोलात जात नाही.