मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी (२३ नोव्हेंबर) शिर्डीला गेले असताना अचानक त्यांनी आपल्या नियोजित कार्यक्रमात बदल केला. यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी सिन्नरमध्ये जाऊन एका ज्योतिषाकडून आपलं भविष्य जाणून घेतल्याची जोरदार चर्चा आहे. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंचे कान टोचले आहेत. “ज्योतिषाकडे जाऊन आपलं भविष्य बघणं म्हणजे २१ व्या शतकात सर्व जग चाललं असताना आपण अंधश्रद्धांना खतपाणी घालण्यासारखं आहे,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

अजित पवार म्हणाले, “आपण का अंधश्रद्धेला खतपाणी घालतो मला समजत नाही. प्रत्येकाची कुठे ना कुठे निष्ठा असते, विश्वास असतो त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी भविष्य पाहिल्याच्या बातम्या आल्या आहेत. प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे माहिती नाही. त्यामुळे वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केली पाहिजे.”

“शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन होतं तेव्हा आम्ही…”

“एक गोष्ट खरी आहे की, आम्ही राजकीय लोक कुठेही गेलो तर तेथील स्थानिक देवस्थानांना भेट देतो. शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन होतं तेव्हा आम्ही सकाळी सकाळी लवकर जाऊन शिर्डी साईबाबांचं दर्शन घेतलं. पंढरपूर परिसरात जातो तेव्हा आम्ही पांडुरंगाचं दर्शन घेतो. जेजुरी परिसरात जातो तेव्हा खंडेरायाचं दर्शन घेतो. तुळजापूर परिसरात तुळजाभवानीचं दर्शन घेतो. कोल्हापुरात गेल्यावर अंबाबाईचं दर्शन घेतो,” असं अजित पवारांनी नमूद केलं.

पाहा व्हिडीओ –

“ज्योतिषाकडे जाऊन आपलं भविष्य बघणं म्हणजे…”

अजित पवार पुढे म्हणाले, “ही आपली परंपरा आहे. त्याबद्दल आपल्या मनात आदराचं, श्रद्धेचं स्थान आहे. तिथंपर्यंत मी समजू शकतो. मात्र, ज्योतिषाकडे जाऊन आपलं भविष्य बघणं म्हणजे २१ व्या शतकात सर्व जग चाललं असताना आपण अंधश्रद्धांना खतपाणी घालण्यासारखं आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : कर्नाटक सरकारच्या दडपशाहीसमोर महाराष्ट्र सरकार कमी पडतंय का? मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“आमच्यासारखे तर हतबलच झालेत”

“तंत्रज्ञानाच्या युगात अनेक बदल होत आहेत. अशावेळी विज्ञान काय सांगतंय हे न पाहता पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात. यावर काय बोलावं, आमच्यासारखे तर हतबलच झालेत,” असं म्हणत अजित पवारांनी एकनाथ शिंदेंचे कान टोचले.