बारामती : बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘ब’ गटातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना या कारखान्याच्या अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अजित पवार यांनी आपल्याच नावाची घोषणा केली. त्यामुळे या निवडणुकीला आणखी रंगत आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या ‘श्री नीळकंठेश्वर पॅनल’च्या प्रचाराला शनिवारी सुरुवात केली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष केशव बापू जगताप, माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, तालुका अध्यक्ष राजवर्धन शिंदे, बाजार समितीचे माजी सभापती सुनील पवार, पीडीसी बँकेचे संचालक संभाजी होळकर आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘एखाद्याला निवडून आणायचे की नाही, हे ठरवले तर मी काय करू शकतो हे राज्यासह पुरंदर आणि शिरूरला माहीत आहे. विरोधकांकडून आम्ही सहकार मोडीत काढायला निघालो असल्याची टीका केली जाते. मात्र, विरोधकांचा हा आरोप खोटा आहे. माळेगाव कारखान्याचे भले करण्याची हिंमत आणि ताकद फक्त अजित पवारमध्येच आहे.’
‘कारखान्याची निवडणूक लढवणाऱ्यांपैकी काहींना दोघेजण उठवायला लागतात. वय झाले तरी दुसऱ्याला संधी दिली जात नाही. ज्यावेळी मला वाटेल माझ्यापेक्षा उजवा उमेदवार तुम्हाला मिळाला आहे, तेव्हा मी स्वतः मागे राहीन.’ असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांचे नाव न घेता टीका केली.
‘जबाबदारी घेण्याचा सर्वांना अधिकार’
‘लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा आणि जबाबदारी घेण्याचा अधिकार आहे.’ अशी टीप्पणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या ‘बळीराजा सहकार बचाव पॅनल’च्या प्रचाराचा प्रारंभ खासदार सुळे आणि युवा नेते युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत पणदरे येथे झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या.