Ajit Pawar on Parth Pawar Land Deal: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने पुण्याच्या कोरेगाव पार्क येथील ४० एकरांचा भूखंड विकत घेतल्यानंतर राजकीय आरोपांची राळ उठली. विरोधकांनी आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः भाष्य केले आहे. माध्यमांशी बोलत असताना त्यांनी मुलगा पार्थ पवारच्या खरेदी प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडली.
“माध्यमांनी जे काही प्रकरण चालवले आहे. त्याची पूर्ण माहिती आता माझ्याकडे नाही. माझा त्या गोष्टीशी थेट किंवा दुरान्वयेदेखील संबंध नाही. ३५ वर्षांपासून महाराष्ट्रातील जनता मला ओळखते. मी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेण्याचे ठरवले आहे. दोन-चार महिन्यांपूर्वी असे काहीतरी चालू असल्याचे माझ्या कानावर आले होते. कोणत्याही चुकीच्या गोष्टी करू नयेत, अशा सूचना मी दिल्या होत्या. पण मधल्या काळात काय झाले? मला माहीत नाही”, असे अजित पवार म्हणाले.
मी कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारा माणूस
अजित पवार पुढे म्हणाले, “मी आजपर्यंत कधीही माझ्या जवळच्या किंवा दूरच्या नातेवाईकाला लाभ होईल, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेले नाहीत. मी कधीही अधिकाऱ्यांना फोन करून काही आदेश दिलेले नाहीत. उलट यानिमित्ताने उपमुख्यमंत्री म्हणून मी सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांगेन की, जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचे करत असेल किंवा नियमात न बसणारे काम करत असेल तर त्याला माझा पाठिंबा नसेल. मी कायद्याच्या आणि नियमाच्या चौकटीत राहून काम करणारा माणूस आहे.”
मुख्यमंत्र्यांनी जरूर चौकशी करावी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलत असताना या प्रकरणाची सखोल चौकशी करू असे म्हटले होते. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, मघाशी कुणीतरी मला मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया दाखवली. मी म्हणेण मुख्यमंत्र्यांनी जरूर या प्रकरणाची चौकशी करावी. तो त्यांचा अधिकार आहे. त्यातील सत्यता पडताळून पाहणे, हे सरकारचे कामच आहे. पण मी अद्याप या प्रकरणाची माहिती घेतलेली नाही. उद्या माहिती घेऊन सायंकाळी याबाबत वस्तूस्थिती मी मांडेन.
“तुमच्या आमच्या घरातील मुले सज्ञान होतात तेव्हा ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने व्यवहार करतात. पण यासाठी मी कोणत्याही अधिकाऱ्याला फोन केलेला नाही किंवा माझा यात दुरान्वये संबंध नाही. मी संविधानाला माननारा आणि कायद्याने चालणारा आणि इतरांनीही कायद्याप्रमाणे वागावे, यासाठी प्रयत्न करणारा माणूस आहे. त्यामुळे या प्रकरणात उद्या मी सविस्तर माहिती घेऊन यावर बोलेन”, असेही अजित पवार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले होते?
या प्रकरणावर माध्यमांशी बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, “सदर प्रकरणासंदर्भात मी सर्व माहिती मागवली आहे. महसूल विभाग, आयजीआर, लँड रेकॉर्ड्स याची सर्व माहिती मागितली आहे. योग्य ते चौकशीचे आदेशही मी दिलेले आहेत. प्राथमिकदृष्ट्या जे मुद्दे समोर येत आहेत. ते गंभीर आहेत. त्यामुळे त्याबाबत योग्य माहिती घेऊनच बोलले पाहिजे. त्यादृष्टीने आज माहिती मिळाल्यानंतर शासनाची पुढची कारवाई काय आहे, त्याबाबत दिशा स्पष्ट करू.”
