महाविकास आघाडीचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी व मंगळवारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम व निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. त्यानंतर सर्व नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदही घेतली. निवडणूक अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीवेळी राज ठाकरे व मविआ नेत्यांनी मतदार याद्यांमधील घोळाचा मुद्दा उपस्थित केला. राज ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्याना सुचवलं की मतदार याद्या तातडीने दुरुस्त करा. याद्यांमधील चुका दुरुस्त झाल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या. त्यासाठी सहा महिने गेले तरी चालतील. आवश्यकता असल्यास स्थानिक निवडणुका सहा महिने पुढे ढकला. अशी मागणी केली. या पत्रकार परिषदेत बोलत असताना राज ठाकरेंनी अजित पवारांची मिमिक्री केली. याबाबत विचारलं असता अजित पवारांनी राज ठाकरेंना उत्तर दिलं.
राज ठाकरेंकडून अजित पवारांची मिमिक्री
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला २३२ जागा मिळाल्या. या २३२ जागा निवडून आल्यानंतरही संपूर्ण महाराष्ट्रात सन्नाटा होता. सगळ्यांना धक्का बसला, म्हणजे निवडून आलेल्यांनाही धक्का बसला, पडलेल्यांना बसतोच. निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा अशी कुठली निवडणूक होती ती? “सध्या मतदार याद्यांचा विषय महत्त्वाचा आहे. आता निवडणुका होणार का, निवडणुका होणार असतील तर कशा होणार हे महत्त्वाचं आहे. निवडणूक कोणाबरोबर होणार हा आत्ताचा विषय नाही. २०१७ च्या पत्रकार परिषदेत मी विरोधी पक्षांच्या नेत्यांबरोबर होतो. विशेष म्हणजे त्यावेळी आमच्याबरोबर या मंचावर उपमुख्यमंत्री अजित पवारही होते. आज त्यांनी देखील आमच्याबरोबर यायला हवं होतं. कारण ते त्यावेळी तावातावाने बोलत होते, मुद्दे मांडत होते.” असं म्हणताना त्यांनी अजित पवारांची मिमिक्री केली. यावर अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.
अजित पवारांनी राज ठाकरेंना काय उत्तर दिलं?
हे बघा मला कुणीही मिमिक्री केली तरीही माझ्या अंगाला काही भोकं पडत नाहीत. मिमिक्री करणारे मिमिक्री करत राहतील. काम करणारा मी माणूस आहे मी काम करत राहिन असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. मी आज शेतकऱ्यांसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. अशा मिमिक्री करणाऱ्यांना, मिमिक्री कोण करतं? मला त्यात पडायचं नाही. मी उत्तर दिल्यावर तुम्ही राज ठाकरेंना विचारणार अजित पवार असं म्हणाले. मला या सगळ्यात पडायचं नाही. असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.