Ajit Pawar NCP Split : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांनी बंडखोरी केली असून आता या पक्षातही दोन गट निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादीतील बरेच आमदार अजित पवारांसह गेले असून शरद पवार गटाकडे किती संख्याबळ आहे हे अद्यापही जाहीर झालेले नाही. दरम्यान, बंडखोरी मागे नेमका कोणाचा हात होता यावरही खुलासा होऊ शकलेला नाही. छगन भुजबळ आणि अजित पवारांकडे या बंडखोरीचा रोख असला तरीही छगन भुजबळांनी हात वर केले आहेत. नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेतही छगन भुजबळांनी याबाबत वक्तव्य केलं होतं. यावरून शरद पवार गटाचे नेते आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू मांडली.

रोहित पवार म्हणाले की, “भाजपाने योग्य पद्धतीने डाव खेळला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी मराठी अस्मिता जपण्याकरता शिवसेना काढली आणि भाजपाने ती फोडली. अनेक नेते आपल्या कामात गुंतून राहावेत याकरता भाजपाने उद्धव ठाकरे यांची पार्टी फोडली आणि आता राष्ट्रवादी फोडली. त्यामुळे उत्तर प्रत्युत्तर आम्ही आमच्यातच देतोय आणि भाजपा राहतेय बाजूला.”

हेही वाचा >> “काय अडचण आली होती डॅडा?” आमदार रोहित पवारांची भावनिक पोस्ट; सांगितला घरी घडलेला ‘तो’ प्रसंग!

“नाशिकमध्ये भुजबळ बोलत असताना त्यांनी सहजपणे अजित पवारांना बाजूला काढलं. माझा अनुभव आणि वय कमी पडतं. पण तिथे सहजपणे पार्टी फुटायचं खापर अजित पवारांवर फोडलं गेलं. नाशिकमधील पोस्टरवर अजितदादांचा फोटोही नव्हता. म्हणजेच हे चार पाच नेते अजित दादांना व्हिलन करत आहेत. अजितदादा मोठे नेते आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय लोकांनाही पटला नाही आणि आम्हाला पटला नाही. सध्या सुरू असलेलं राजकारण भाजपा एसीत बसून बघून मजा घेतंय आणि आम्ही आमच्यातच भांडतोय. कुटुंब कोणी फोडलं, पार्टी कोणी फोडली हे कोणी विसरणार नाही अशी भूमिका माझी आहे”, असंही रोहित पवार म्हणाले.

तुम्ही विकास केला नाही का?

“विकासासाठी तुम्ही निर्णय घेतला, मग तुमच्याकडे पद होतं तेव्हा विकास केला नाही का असा प्रश्न निर्माण होतोय . त्यामुळे ही लढाई अस्तित्वाची आहे, अस्मितेची आहे, स्वाभिमानाची आहे आणि विचारांची आहे”, असंही रोहित पवार म्हणाले. “जेव्हा या सर्व घडामोडी घडत होत्या तेव्हा माझ्या आई वडिलांनी प्रश्न केला की, जेव्हा आम्ही वयस्कर होऊ, आम्ही ८० च्या पुढे जाऊ तेव्हा तू सुद्धा अशी भूमिका घेशील का? माझ्याच आईवडिलांना असा प्रश्न पडला असेल तर सामान्य कुटुंबातील आई-वडिलांना हा प्रश्न पडला नसेल का?, असं ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी एक भूमिका घेतली विचारासोबत राहण्याची, पार्टीसोबत राहण्याची, आजोबांसोबत राहण्याची. हा माझा निर्णय आहे. या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना महाराष्ट्रातील तमाम जनतेला प्रश्न पडत आहे की एक कुटुंब फुटत असताना तुम्ही काय निर्णय घेणार? महाराष्ट्रातील तमाम जनता हा निर्णय व्यक्तिगत घेत आहे. स्वतःचं सरकार सत्तेवर येण्याकरता दोन मोठे पक्ष फोडले. हे काही जनतेला पटलेलं नाही”, असंही रोहित पवार म्हणाले.