राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून त्यांच्याच घरासमोरुन जाणाऱ्या मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील समस्यांची आठवण करुन दिली आहे. प्रवाशांची व्यथा मांडताना पवार यांनी पूर्व द्रुतगती मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील प्रवासी जीव धोक्यात टाकून यावरुन प्रवास करत असल्याचं म्हटलं आहे. या रस्त्याची डागडुजी आणि इतर समस्या तात्काळ सोडवाव्यात अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

‘मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील विविध समस्यांबाबत’ असा या पत्राचा विषय आहे. “पावसाळा सुरु झाल्यापासून राज्यातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून यामुळे मुंबई-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर दररोज असह्य वाहतूक कोंडी होत आहे,” अरं विरोधी पक्षनेत्यांनी पत्राच्या सुरुवातीला म्हटलं आहे. विशेष म्हणजे आनंद नगर टोलनाक्यावरुन ठाण्यात प्रवेश केल्यानंतर काही किलोमीटरवर एकनाथ शिंदे यांचं लुईसवाडी येथील खासगी निवासस्थान याच महामार्गावर आहे. त्यामुळे अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या घरासमोरील रस्त्यासंदर्भातील तक्रार त्यांनाच पत्राच्या माध्यमातून केली आहे.

“पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून या अपघातामध्ये अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मणक्यांच्या आजारांचं प्रमाण वाढलं आहे. वाहतूक कोंडीमुळे शहरातील प्रदुषणामध्ये भर पडत आहे. मुंबई-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणारे नागरिक आपला जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत,” असं या पत्रात म्हटलं आहे.

“या परिसरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करणे, पुलांचे अपूर्ण काम युद्धपाथळीवर पूर्ण करणे, अवजड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढणे यासाठी शहरातील लोकप्रतिनिधी, वाहतूकदार संघटना, प्रवासी संघटना, स्थानिक नागरिक आदींना विश्वासात घेऊन वाहतुकीचे सुयोग्य आणि प्रभावी नियोजन करावे. अनुषंगित उपाययोजना तात्काळ करण्याबाबत संबंधितांना सूचना द्याव्यात. अशहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करुन या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांना दिलासा देण्याचे काम करावे, ही विनंती,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गावरही वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. खास करुन ठाणे आणि पुढे भिवंडी नाक्यापर्यंत अनेकदा या मार्गावर वाहनांच्या अनेक किलोमीटरच्या रांगा पहायला मिळतात.