राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरून खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता अधिवेशन शेवटच्या टप्प्यात आलं असून त्याअनुषंगाने विरोधी पक्षांकडून महत्त्वाचे मुद्दे दोन्ही सभागृहांत मांडले जात आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी अंतिम आठवडा प्रस्ताव मांडताना राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर सरकारला प्रश्न विचारले. यावेळी अजित पवारांनी त्यांच्या शैलीत मिश्किल टिप्पणी करताच सभागृहात एकच हशा पिकला!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं झालं काय?

अजित पवारांनी आज विरोधी पक्षनेते म्हणून अंतिम आठवडा प्रस्ताव मांडायला सुरुवात केली. यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करणाऱ्या अनिक्षा जयसिंघानीचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. तसेच, सर्वच आमदारांनी काळजी घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी येणारे अनुभव अजित पवारांनी त्यांच्या मिश्किल शैलीमध्ये सभागृहासमोर मांडले.

“राजकीय क्षेत्रात काम करत असणाऱ्या प्रत्येकानं आपल्या घरात कोण येतंय? का येतंय? हे बघायला हवं. आम्ही काही राजकीय पक्ष विरोधात असलो, तरी नेते म्हणून काम करत असतो. सरकारनंही आमच्याकडे येणाऱ्यांची माहिती आम्हाला द्यावी. नाहीतर तुमच्यावर जो प्रसंग आला, तो आमच्यावरही येऊ शकतो. हे लोक कुठेही जायला कमी करत नाही”, असं देवेंद्र फडणवीसांना उद्देशून अजित पवार म्हणाले.

“आमदारांनी व्हिडीओ कॉलवर चेहरा दाखवूच नका!”

“अलिकडे तर एक पद्धत निघाली आहे. व्हिडीओ कॉल करायचा आणि आपण तो उचलला की समोर असं काही चित्र दिसतं की काय करायचं कळतच नाही. सभागृहातल्या पुरुष आमदारांना विनंती आहे की व्हिडिओ कॉल आला की तुमचा चेहरा दाखवूच नका. आपण बघायला लागलो तर तिकडून फोटो काढतात आणि सांगतात की हे बघा आम्ही यांच्याशी बोलत होतो. स्क्रीनशॉट काढतात. ही फसवणाऱ्या लोकांची पद्धत आहे. याला सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाच्या आमदारांनी बळी पडू नये”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांनीही नाना पटोलेंना डोळा मारला, पण..”

“आजकाल राजकारण्यांना कोणत्याही गोष्टीची सूट राहिलेली नाही. आपण चुकून डोळा बंद केला तरी ‘डोळा मारला, डोळा मारला’ म्हणत राहतात. मघाशी मी आणि मुख्यमंत्री तिथे उभे होतो तर तिथेही एक घटना घडली. आम्ही ५-६ लोक बसलो असताना त्यांनी नानांना (पटोले) डोळा मारला. पण तिथे कॅमेरे नव्हते म्हणून बरं झालं. त्यातून अर्थ काहीही निघतो”, असा टोला अजित पवारांनी लगावताच सभागृहात हशा पिकला.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून विधिमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी उद्धव ठाकरे बोलत असताना मागे कुणालातरी डोळा मारणाऱ्या अजित पवारांची व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे. यावर अजित पवारांनी मिश्किल टिप्पणी केली. “उद्धवजी तिकडे बोलायला आले आणि नेमकं तेव्हा मी कुणालातरी डोळा मारला. पण मग मी काय यांच्यामुळेच डोळा मारला का? हे बरोबर नाही. पार राज ठाकरेंनीही माझ्या डोळा मारण्याची दखल घेतली. कशाचा कशाला मेळ नाही. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला डोळा मारला होता”, अजित पवार यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar mocks devendra fadnavis eknath shinde eye wink video pmw
First published on: 24-03-2023 at 18:44 IST