राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हजरजबाबी स्वभाव आणि बोलण्याची वेगळी शैली यासाठी ते सर्वश्रुत आहेत. त्यांच्या काही विधानांमुळे ते अडचणीत देखील सापडल्याचं पाहायला मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार एखाद्या मुद्द्यावर काय बोलले, याची वेगळीच चर्चा होताना दिसून येते. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना देखील अजित पवारांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर चौफेर टोलेबाजी केली. यावेळी हनुमान जन्मभूमीचा वाद, हनुमान चालीसावरून सुरू असलेलं राजकारण या मुद्द्यांवर अजित पवारांनी मिश्किल शब्दांत आपली भूमिका मांडली. त्यांनी स्टेजवरून केलेल्या फटकेबाजीवर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राम जन्मभूमी आणि कृष्ण जन्मभूमीचा वाद झाल्यानंतर आता हनुमान जन्मस्थळावरून वाद निर्माण होऊ लागला आहे. हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला? यावरून वाद सुरू असताना अजित पवार यांनी त्यावर मिश्किल शब्दांत टोलेबाजी केली आहे. “सध्या भावनेला मारक निर्णय होऊ लागले आहेत. त्याला आपण विरोध करायला हवा. (सध्याच्या वादानंतर) मारुती राया देखील म्हणत असतील माझा जन्म कुठं झाला ते मला माहित आहे, तुम्ही का भांडताय? कोण म्हणतंय कर्नाटक, कोण म्हणतंय नाशिक, कोण म्हणतंय यूपीत…ठीक आहे, झाला असेल.. पण ते मारुती रायाच आहेत. कुठलंतरी वेगळं सांगून काही उपयोग आहे का? आपल्याला शनिवार धरून दर्शन घ्यायचंच आहे. यांच्यातून नागरिकांची दिशाभूल करण्याच काम सुरू आहे”, असं अजित पवार म्हणाले.

नाशिकच्या अंजनेरी येथील हनुमान जन्मस्थळाबाबत तोडगा काढण्यासाठी शास्रार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, याठिकाणी दोन्ही बाजूच्या महंतांकडून बसण्याच्या जागेवरून चांगलीच खडाजंगी झालेली पहायला मिळाली. अक्षरश: दोन्ही बाजूचे महंत हमरीतुमरीवर उतल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे सभेचा मूळ विषय बाजूलाच राहिला आणि काही वेळ मानअपमानाचा गोंधळ उडाला होता.

महंतांच्या वादावर टोला

दरम्यान, हनुमान जन्मभूमीसंदर्भात महंतांच्या एका परिषदेत झालेल्या राड्यावर देखील अजित पवारांनी खोचक शब्दांत निशाणा साधला. “महंतांनी गप्प बसावं तर ते एकमेकांना माईक घेऊन मारतायेत. हे काय चाललंय? हे पटतंय का तुम्हाला? अनेकांना महंत, महाराज म्हणतो आपण. पण ते महाराजच एकमेकांना मारायला लागलेत. काय करावं ते काही कळत नाहीये. या गोष्टांबाबत विरोधी पक्ष आणि त्यांच्या हस्तकांनी टाकलेल्या जाळ्यात न अडकता आणि त्यांच्या अजेंड्यामागे फरफटत न जाता स्वत:च्या विकासाचा अजेंडा निर्माण करण्याचं काम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी करायला हवं”, असं अजित पवार म्हणाले.

धरणासंदर्भातील ‘त्या’ वक्तव्याची अजित पवारांना आठवण; म्हणाले, “बोलताना टाळ्या पडायला लागल्या की हळू…”

नोटबंदीवरून भाजपावर निशाणा

दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवारांनी नोटबंदीच्या मुद्द्यावरून केंद्रातील भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. “नोटाबंदी करत असताना सांगितलं होतं की १००० आणि ५०० ची नोटाबंदी केल्यानंतर नकली नोटा बाजारातून जातील. काळा पैसा बाहेर येईल. आम्ही आंदोलनं केली. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यावेळेस राज्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय नागरिकांना पटला होता. पण आज काय झालं? आता तर कळतंय की सगळ्यात जास्त ५०० च्या नकली नोटा बाजारात आल्यात. याचं उत्तर कोण देणार? नोटाबंदी झाली तेव्हा नकली नोटा किती मिळाल्या ते सांगितलं नाही. हिशोबच नाही. काहीतरी मिळाल्या असतील ना? जे सांगितलं होतं ते घडलं नाही”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar mocks hanuman birth place issue in pimpri ncp melava pmw 88 kjp
First published on: 03-06-2022 at 20:05 IST