Ajit Pawar IPS Anjali Krishna Video Viral: सोलापूर जिल्ह्यातील एका गावात मुरुम उत्खननावर कारवाई करत असलेल्या महिला आयपीएस अधिकाऱ्याला कारवाई रोखण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन केला होता. अजित पवार यांनी कारवाई रोखण्याच्या सूचना दिल्यानंतर महिला आयपीएस अधिकाऱ्याने दुसऱ्यांच्या फोनवर नाही तर थेट माझ्या फोनवर करायला हवा होता, असे सांगितल्यानंतर अजित पवार संतापले आणि त्यांनी तुमची एवढी डेअरिंग वाढली का? असा सवाल विचारला होता. यावरून आता शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी टीका करत राजीनाम्याची मागणी केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे असलेले नेते हे चोर, दरोडेखोर आहेत, असे आम्ही म्हणत होतो. त्यांना सुरक्षा देण्यासाठीच यांना सत्ता हवी आहे. याआधी आम्ही सुनील शेळकेंचे अवैध खाणकामाचे प्रकरण बाहेर काढले होते. आमदार सुनील शेळकेंनी सरकारला कोट्यवधींचा चुना लावला आणि अजित पवार त्यांना संरक्षण देत आहेत. अशी असंख्य लोक आहेत. आता अजित पवार अशांना सुरक्षा देत आहेत.”
आता कुठे गेली तुमची शिस्त
“अजित पवारांवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. अजित पवार आता एका आयपीएस अधिकाऱ्याला धमकावत आहेत. ते नेहमी म्हणतात ना, मी बेशिस्त खपवून घेणार नाही. मग आता त्यांनी काय केले? तुमच्या पक्षातल्या चोरांना संरक्षण देण्यासाठी तुम्ही एका आयपीएस अधिकाऱ्याला अशाप्रकारे दम देता. मग आता कुठे गेली तुमची शिस्त?”, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
संजय राऊत पुढे म्हणाले, “तुम्ही अर्थमंत्री आहात. हे प्रकरण समोर आल्यानंतर अजित पवार यांना मंत्रिमंडळात राहण्याचा नैतिक अधिकार उरत नाही. याआधी अशा प्रकरणात नैतिकतेच्या मुद्द्यावर मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत. या राज्याचा उपमुख्यमंत्री असलेला माणूस बेकायदेशीर कृत्यांना पाठिंबा द्या म्हणून आयपीएस अधिकाऱ्याला सांगत आहे. एका तरूण महिला आयपीएस अधिकाऱ्याला मी सांगतोय ते कर, असे सांगत आहेत. तुम्ही सर्व चोरांचे सरदार आहात, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) आरोप फेटाळले
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) हे आरोप फेटाळले आहेत. आयपीएस अधिकाऱ्याला अजित पवारांनी झापल्याचा दावा पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी फेटाळून लावला. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात असलेल्या कुर्डू गावातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या कारवाईविरोधात एकवटले होते. त्यावेळी प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा तिथे होत्या. प्रशिक्षणार्थी अधिकारी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना तुम्ही कोण? असे विचारत असेल तर हेदेखील चुकीचे आहे, असे आनंद परांजपे म्हणाले.