Ajit Pawar On Shivsena Ministers absent in Cabinet Meeting : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. त्यासाठी सर्वज राजकीय पक्षांकडून राज्यभर जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. त्या अनुषंगाने वेगवेगळ्या पक्षातून भाजपात इनकमिंग सुरू आहे. यातच कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र, यावरूनच शिवसेनेचे (शिंदे) नेते नाराज झाल्याची चर्चा आहे.
आज मंत्रिमंडळाची बैठक होती, या बैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यतिरिक्त शिवसेनेचे दुसरे कोणतेही मंत्री उपस्थित नव्हते. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत मंत्रिमंडळ बैठकीत काय घडलं? याविषयीची माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे.
अजित पवार काय म्हणाले?
शिवसेनेचे (शिंदे) मंत्री कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहिले नाहीत अशी चर्चा आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता अजित पवार म्हणाले की, “मला त्याबाबत काहीही माहिती नाही आणि मला ते जाणवलंही नाही. कारण आमचेही मकरंद (आबा) पाटील, मंत्री दत्तात्रय भरणे नव्हते. हसन मुश्रीफही लवकर निघून गेले, कारण त्यांना पुढे जायचं होतं. त्यामुळे माझा असा समज झाला की आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अर्जांची छाननी आहे. त्यामुळे मंत्र्यांची मंत्रिमंडळाच्या बैठकीला संख्या घटली असा माझा अंदाज होता. मात्र, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मला काही पत्रकारांनी विचारलं की असं काही झालं आहे का? पण मला खरोखरचं बैठकीत असं काही जाणवलं नाही. अन्यथा मी लगेच एकनाथ शिंदे यांना विचारलं असतं”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
काही माजी आमदार फोडल्यामुळे सध्या महायुतीत नाराजीनाट्य सुरू आहे का? असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की, “प्रत्येकजण आपआपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो. निवडणुकीच्या काळात याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं. निवडणुकीत तिकिटे देण्याच्या कारणावरून याचं प्रमाण वाढतं. मात्र, यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे व त्यांचे काही सहकारी यांनी एक बैठक केली अशी माझी माहिती आहे”, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं मंत्र्यांच्या गैरहजेरीचं कारण
मंत्री बावनकुळे म्हणाले, “राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग चालू आहे. अनेक मंत्री आपापल्या जिल्ह्यांमध्ये आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांची संख्या कमी होती. मंत्र्यांच्या गैरहजेरीचं दुसरं कुठलंही कारण नव्हतं. दुसरा कुठलाही विषय नाही. अनेक मंत्री हे वेगवेगळ्या जिल्ह्यांचे प्रभारी आहेत. त्यामुळे ते त्या-त्या जिल्ह्यांमध्ये आहेत. या मंत्र्यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेतली होती. त्यानंतर ते आपापल्या भागात गेले आहेत.”
बावनकुळेंनी प्रसारमाध्यमांचे दावे फेटाळले
“राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेही काही मंत्री त्यांच्या जिल्ह्यांमध्ये आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांची संख्या कमी होती. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री (एकनाथ शिंदे व अजित पवार) या बैठकीला उपस्थित होते. आताही त्यांची वैगळी बैठक चालू आहे. नुकतीच इन्फ्रास्ट्रक्चर समितीची बैठक पार पडली. आता वनविभागाची बैठक चालू आहे. मात्र, प्रसारमाध्यमं जी बातमी दाखवत आहेत तसं काहीच नाही.”
