Ajit Pawar on Harshal Patil Suicide Case : जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या नळपाणी योजनेचे कंत्राटदार हर्षल पाटील (३५) यांनी मंगळवारी (२२ जुलै) त्यांच्या शेतात गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यांचे शासनाकडे सुमारे दीड कोटी रुपयांचे देयक थकीत असल्याने निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा राज्य कंत्राटदार संघटनेने केला आहे. या घटनेमुळे राज्यभरात सरकारविरोधात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या आत्महत्या प्रकरणाविषयी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

अजित पवार म्हणाले, “हर्षल पाटील हा जलजीवन मिशनअंतर्गत काम करणारा मुख्य कंत्राटदार नव्हता. तो उपकंत्राटदार म्हणून काम करत होता. आम्ही हर्षल पाटीलला कंत्राट दिलं नव्हतं. आम्ही कंत्राटदाराला पैसे देतो आणि कंत्राटदार उपकंत्राटदाराला पैसे देतो. त्यांच्यात काय गोंधळ झाला त्याची सध्या सरकारकडे माहिती नाही. पोलीस त्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत.”

उपमुख्यमंत्री म्हणाले, “त्या घटनेविषयी जी माहिती माझ्यापर्यंत आली आहे त्यानुसार आम्ही (सरकारने) एक कंत्राटदार नेमला होता. त्या कंत्राटदाराने उपकंत्राटदाराला काम दिलं होतं. आमचा थेट कंत्राटदाराशी संबंध येतो. उदाहरण म्हणून सांगतो, उद्या तुम्ही कंत्राटदार म्हणून काम घेतलं, आम्ही तुमची बिलं पास करून तुम्हाला पैसे दिले, परंतु तुम्ही दुसराच उपकंत्राटदार नेमला तर… उपकंत्राटदाराला पैसे देण्याचा आमचा अधिकार नाही. तुम्ही कंत्राट घेतल्यावर तिथे तुम्ही दुसऱ्याला काम दिलं तर तो तुमचा विषय. तुमचं तुमच्यात काय ठरलंय ते आम्हाला माहिती नसतं. परंतु, प्रसारमाध्यमं शहानिशा न करता ब्रेकिंग न्यूज दाखवत असतात.”

पोलीस आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत : अजित पवार

“केंद्र सरकारची जलजीवन मिशन ही योजना आहे. त्यामध्ये राज्य सरकार ५० टक्के व केंद्र सरकार ५० टक्के निधी देत असतं. या योजनेअंतर्गत आम्ही काही त्यांना (हर्षल पाटील) कंत्राट दिलं नव्हतं. तरी देखील एखाद्या व्यक्तीचा जीव जाणं किंवा त्याने आत्महत्या करणं गंभीर आहे. त्याच्या आत्महत्येची कारणं काय याबद्दल पोलीस यंत्रणा तपास करत आहे. त्याचा मोबाईल तपासला जातोय, त्याने कोणाकोणाला फोन केला होता, कोणाशी त्याचं काय संभाषण झालं होतं ते तपासलं जात आहे. वेगळं काही कारणं आहे का, त्याने आत्महत्येपूर्वी काही लिहून ठेवलं आहे का त्याची माहिती पोलीस जमवत आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही हर्षल पाटीलला कम दिलं नव्हतं : अजित पवार

अजित पवार म्हणाले, “मी प्रसारमाध्यमांमार्फत राज्यातील जनतेला सांगू इच्छितो की झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. पण आम्ही हर्षल पाटीलला काम दिलं नव्हतं. दुसरा कंत्राटदार काम करत होता. हर्षल त्याच्या हाताखाली काम करत होता.”