राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांना कराडमधील एका शासकीय कार्यक्रमाचं निमंत्रणच देण्यात आलं नसल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून अजित पवारांना निमंत्रण द्यायला हवं होतं, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय दावे-प्रतिदाव्यांमुळे राजकारण तापलं असताना त्यावर अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यामध्ये आयोजित महत्त्वाच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

नेमका वाद काय?

कराडमध्ये आज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ३८व्या पुण्यतिथीनिमित्त कृषी प्रदर्शन आणि इतर विकासकामांचं उद्घाटन करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. मात्र, या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “राजशिष्टाचाराप्रमाणे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना निमंत्रण देणे आवश्यक असून कराड आणि आजूबाजूच्या परिसरातील विकासकामांमध्ये अजित पवारांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे”, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

“महाविकास आघाडीच्या काळात अजित पवार अर्थमंत्री होते. त्यावेळी प्रशासकीय इमारतीच्या उभारणीसाठी महाविकास आघाडी सरकारने निधी उपलब्ध करून दिला होता. त्या माध्यमातून ही कामे झाली आहेत. तहसीलच्या इमारतीचे कामकाज दोन वर्षांपासून सुरु आहे. आज त्याचे लोकार्पण होत आहे”, असंही ते म्हणाले.

कराडमधील कार्यक्रमात अजित पवारांना डावलल्याचा राष्ट्रवादीचा आरोप; नाराजी व्यक्त करत म्हणाले, “मविआच्या काळात…”

“तिथल्या सर्किट हाऊससाठी मीही बराच प्रयत्न केला होता”

दरम्यान, याविषयी माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता अजित पवारांनी त्यापेक्षा इतर महत्त्वाचे प्रश्न असल्याचं सांगितलं. “तिथे सर्किट हाऊस तयार करताना मीही बराच प्रयत्न केला होता. आम्ही काय ते उपकार केले नव्हते. शेवटी लोकांची कामं करणं हे प्रत्येकाचं काम असतं. पण त्यात मी स्वत: रस घेऊन बऱ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगलं गेस्ट हाऊस आपण केलं आहे. पण मला निमंत्रणच नव्हतं तर मग मी कसं जाणार?”, असं अजित पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ठीक आहे. चालतं. या गोष्टीला किती महत्त्व द्यावं? शेवटी बाकीचेही खूप महत्त्वाचे प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहेत”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.