Ajit Pawar Speech Maharashtra Rajya Draksha Bagaitdar Sangh convention : पुण्यातील वाकड येथे आज (२४ ऑगस्ट) महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचं ६५ वे वार्षिक अधिवेशन पार पडलं. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या अधिवेशनाला हजर होते. यावेळी अजित पवार यांनी द्राक्ष बागायतदार संघाची प्रगती अधोरेखित केली. तसेच या अधिवेशनाला उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना विनंती केली की आपल्याला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. हे सोडवताना कधी नमतं घ्यावं लागलं तरी चालेल परंतु, आपण सगळी कामं करायची आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी कैलासराव भोसले यांना म्हणाले, “मी तुम्हाला स्पष्ट सांगतो या सर्वांच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, विजेच्या प्रश्नासाठी तुम्ही माझ्याकडे येत चला. बेदाणाचाळीच्या मागणीसंदर्भात द्राक्ष उत्पादक बागायतदार संघ पाठपुरावा करत होता. संघाची सातत्याने मागणी होती त्या मागणीचा सकारात्मक विचार करून बेदाणाचाळीच्या उभारणीसाठी, त्याच्या तांत्रिक कामासाठी कमाल ६० टक्के आणि बांधकामासाठी ४० टक्के अनुदान देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मात्र याच्या अंमलबजावणीत समस्या येत असतील तर मी किंवा आपले कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, आम्ही दोघेही यामध्ये लक्ष घालू.”

माझा आवाज चढला की अनेक लोक येणं टाळतात : अजित पवार

अजित पवार म्हणाले, “यासंदर्भात केंद्राची काही मदत हवी असेल तर आम्ही तिथे देखील बोलू. परंतु, कैलासराव माझी तुम्हाला विनंती आहे की या गोष्टीचा खूप पाठपुरावा करावा लागतो. तुम्ही तो कराल अशी अपेक्षा आहे. हा पाठपुरावा करत असताना अजिबात घाबरू नका. तुमचं काम होत नाही तोवर माझ्या कार्यालयात किंवा दत्तात्रय भरणे यांच्या कार्यालयात येत चला.

“बऱ्याचदा माझा आवाज चढला की अनेक लोक माझ्याकडे येणं टाळतात. ते विचार करतात की आज याचा मूड आहे की नाही. आज कशाला जायचं. याचा मूड चांगला असेल तेव्हा जाऊया. परंतु, तुम्ही असा विचार करू नका. माझा मूड असो अथवा नसो तुम्ही माझ्या कार्यालयात येत चला. कारण आपल्याला शेतकऱ्यांची कामं करायची आहेत.”

“आमच्या भावकीलाही घेऊन येत चला”, अजित पवारांचा शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना सल्ला

उपमुख्यमंत्री म्हणाले, “महत्त्वाच्या पदावर बसल्यावर आपलं काम करून घेण्यासाठी ज्याच्याकडून आपल्याला काम करून घ्यायचं असतं त्याच्यासमोर थोडं नमतं घ्यावं लागतं. थोडं नमतं घ्यावं लागलं तरी चालेल, परंतु आपण तिथे जायचं, तिथे बसायचं, कारण आपण हे सगळं स्वतःसाठी करत नाही. कैलासराव आपण हे सगळं शेतकऱ्यांसाठी करतो, त्यामुळे तुम्ही असाल किंवा तुमचे बाकीचे सगळे सहकारी असतील, गरज पडल्यास तुम्ही तुमच्याबरोबर कधी कधी तुमचे खजिनदार, आमच्या भावकीला (राजेंद्र पवार) घेऊन येत चला. मारुती चव्हाण यांना घेऊन या. कोणीही मनात इतर कुठलाही विचार आणू नका.”