शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नियोजित आयोध्या दौऱ्यावरुन राष्ट्रवादीचे नेत अजित पवार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मागील पाच वर्षांमध्ये बापाचं स्मारक बांधता आलं नाही ते राम मंदिर काय बांधणार असा खोचक सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. जालना येथील समर्थ सहकारी कारखान्याच्या गाळपाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव यांनी राम मंदिर बांधण्याच्या मागणीसाठी आयोध्येला जाणार असल्याचे सांगितले होते. यानंतर या घोषणेवरून विरोधकांना उद्धव यांना लक्ष्य केले आहे. टिका करताना अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. ‘काय तर म्हणे २५ तारखेला अयोध्येला जाणार. काय तिथं दिवा लावणार. अरे तुला तुझ्या बापाचं स्मारक पाच वर्षात करता आलं नाही. तिथं आयोध्येत जाऊन काय करणार आहे.’ अशा शब्दात पवारांनी उद्धव ठाकरेंवर टिका केली. पुढे शहरी भागातील लोकांना समजण्या करता ही गावरान भाषेतील टिका त्यांनी शहरी भाषेतही केली. ‘त्यांना त्यांच्या वडिलांचे स्मारक करता आलेलं नाही पाच वर्षात. ते काय तिथं जाऊन आयोध्येला मंदिर बांधणार आहेत’ अशा शहरी भाषेतही त्यांनी ही टिका केली. या दोन्ही वाक्यांना उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पुढे बलोताना राज्यात भाजप व शिवसेनेची बनवाबनवी सुरु असल्याचा आरोपही पवार यांनी केला.

नारायण राणेंनीही केली टिका

उद्धव ठाकरे राम मंदिर बांधण्याच्या गोष्टी करत आहेत आधी त्यांनी मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक बांधून दाखवावं असं नारायण राणेंनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. तसंच निवडणुका जवळ आल्या असल्यानेच शिवसेनेला राम मंदिराची आठवण आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. शिवसेनेला मुंबईतल्या समस्या सोडवता आल्या नाहीत. शिवसेनेचे मंत्री केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहेत मग इतके दिवस राम मंदिराचा प्रश्न का उपस्थित केला नाही असाही प्रश्न नारायण राणेंनी विचारला आहे. तसंच एवढाच स्वाभिमान होता तर राजीनामा देऊन शिवसेनेचे मंत्री बाहेर का पडले नाहीत? असेही राणेंनी उद्धव ठाकरेंना विचारले होते.