महाराष्ट्राचे माजी उप-मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अजित पवारांचा हा राजीनामा मंजूर केला आहे. मात्र या राजीनाम्यामागचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनाही पवारांच्या राजीनाम्याबद्दलचं खरं कारण माहिती नाहीये. एका वृत्तवाहिनीने संपर्क केला असता, आपल्याला याबद्दलची काही माहिती नसल्याचं पार्थ पवार यांनी सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पवारांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या प्रमुख नेत्यांनाही पवारांच्या राजीनाम्याबद्दल काहीही माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अजित पवार शुक्रवारी शरद पवारांसोबत ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी मुंबईत येणार होते. मात्र पुणे आणि बारामतीमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानाचं पाहणी करण्यासाठी पवारांनी मतदारसंघात राहण्याचं ठरवलं.

अजित पवार यांचं नाव शिखर बँक घोटाळा प्रकरणात पुढे आलं होतं. त्यांच्यासह ७० जणांची नावं २५ हजार कोटींच्या घोटाळ्यात समोर आली होती. ज्यामध्ये शरद पवार यांचंही नाव होतं. आज दिवसभर शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात हजेरी लावणार ही बातमी चर्चेत होती. मात्र कायदा सुव्यवस्थेचं कारण सांगत शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. अजित पवार हे त्या शिखर बँकेच्या संचालक मंडळावर होते. या घोटाळ्यामध्ये शरद पवारांचा संबंध असू शकत नाही कारण ते ना संचालक होते, ना सभासद होते असे सर्वांनीच स्पष्ट केले होते. मात्र कुणीही अजित पवार यांच्यासंदर्भात स्पष्टीकरण दिले नव्हते. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे खळबळ उडाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar son parth also unaware about his resignation psd
First published on: 27-09-2019 at 19:29 IST