गेल्या काही महिन्यांमध्ये गौतम अदाणी आणि अदाणी उद्योह समूह या दोन बाबी चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं. हिंडेनबर्गनं दिलेल्या अहवालामध्ये गौतम अदाणींनी शेअर बाजारात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा दावा करण्यात आला. यानंतर अदाणींचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर घसरले. त्यांचं जागतिक श्रीमंतांच्या यादीतलं स्थानही मोठ्या प्रमाणावर घसरलं. या पार्श्वभूमीवर अदाणींशी संबंधित सर्वच व्यक्तींकडे संशयाच्या नजरेतून पाहिलं जात असताना आता गौतम अदाणींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. यांच्यात नेमकी कशावर चर्चा झाली? यासंदर्भात तर्क-वितर्कांना उधाण आलं असताना त्यावर अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे. कधी झाली भेट? गुरुवारी रात्री गौतम अदाणींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात माहिती समोर आल्यानंतर त्यावरून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्याचबरोबर शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. यासंदर्भात बोलताना अजित पवारांनी यात वेगळं काहीही नसल्याची भूमिका मांडली. "भेट झाली म्हणजे काय झालं? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्हाला काही महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी पंतप्रधानांचीही भेट घ्यावी लागली होती. तेव्हा तेही भेटले होते", असं अजित पवार म्हणाले. शरद पवार-अदाणी भेट! दरम्यान, अजित पवारांना यावेळी माध्यम प्रतिनिधींनी शरद पवार आणि गौतम अदाणींची भेट झाल्याबद्दल विचारणा केली. त्यावर बोलाताना अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं. "गौतम अदाणी अनेक वेळा शरद पवारांची भेट घेत असतात. त्यांची ओळख आहे. त्यांची काही अडचण असेल, प्रश्न असतील, काही गोष्टी मांडायच्या असतील, त्यासाठी ते भेटले असावेत. कदाचित मधल्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या कमिटीने दिलेल्या निकालाबाबत काही बोलायचं असेल. मला माहिती नाही. पण वेगवेगळे उद्योगपती वेगवेगळी गुंतवणूक वेगवेगळ्या राज्यांत करत असतात. जरी हिंडेबर्गचा मुद्दा निघाला असला, तरी अनेक राज्यांत त्यांची गुंतवणूक चालू आहे. ते कशासाठी भेटले हे काही मला माहिती नाही. कारण मी काल संध्याकाळी मुंबईहून पुण्याला गेलो होतो", असं अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी आज…” शरद पवारांच्या पुस्तकात अदाणींचा उल्लेख! काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकात गौतम अदाणींचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरूनही बरीच चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. “गौतम अदाणी या नावाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा बोलबाला झाला आहे. या तरुण उद्योजकाला मी अनेक वर्षांपासून ओळखतो आहे. कमालीचा कष्टाळू आणि साधा! शून्यातून त्यानं आपलं आजचं साम्राज्य उभं केलं आहे. लोकलमध्ये काही छोट्या वस्तूंची विक्री करण्यापासून या माणसाच्या उद्योजकतेला सुरुवात झाली. यानंतर काही छोटे व्यवसाय सुरू करून गौतम यांनी काही पैसे गाठीला बांधले. मग तो हिऱ्यांच्या व्यवसायात पडला", असा उल्लेख शरद पवारांनी या पुस्तकात केला आहे. शरद पवारांनी गौतम अदाणींना दिला होता ‘तो’ सल्ला; स्वत: आत्मकथेत केला उल्लेख; म्हणाले, “मी त्यांना सुचवलं होतं की…!” “गौतम नंतर कोळसा पुरवण्याच्या व्यवसायातही आले. मी गौतमना सुचवलं, ‘वीज प्रकल्पांसाठी कोळसा पुरवण्याबरोबर ऊर्जानिर्मितीच्या क्षेत्रातही तुम्हीच उतरा.’ एकदा प्रफुल्ल पटेल यांच्या वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त गोंदिया इथे गौतम आणि मी एकत्र होतो. त्यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा जिल्ह्यात उद्योजकांनी गुंतवणूक करण्यासाठी शरद पवार यांनी मदत करावी, अशी भावना व्यक्त केली. मी म्हणालो की, उद्योग येतील, पण तुम्हालाही सहकार्य करावं लागेल. आज गौतम अदाणी आले आहेत. त्यांनी मी विनंती करतो, की ऊर्जानिर्मितीसाठी या परिसरात त्यांनी प्रकल्प उभा करावा”, असंही शरद पवारांनी पुस्तकात नमूद केलं आहे.