राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यानंतर या भेटीचे अनेक अर्थ काढून तर्कवितर्कांना उधाण आले. आता स्वत: शरद पवारांनीच या भेटीची माहिती देत कारण स्पष्ट केलं. पवारांनी भेटीचा फोटो ट्वीट करत वर्षावरील भेटीची सविस्तर माहिती दिली.

शरद पवार म्हणाले, “मराठा मंदिर, मुंबई संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त वर्धापन सोहळ्याचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आज (१ जून) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली.”

“यासोबतच महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, नाट्य व कला क्षेत्रातील कलावंत, कारागीर यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्याबाबत व या बैठकीस चित्रपट, नाट्य, लोककला, वाहिन्या व इतर मनोरंजन माध्यमांतील संघटनांना निमंत्रित करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली,” अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

हेही वाचा : VIDEO: शरद पवारांकडून विश्वासात न घेतल्याचा आरोप, एकनाथ शिंदे म्हणाले, “खरं म्हणजे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या भेटीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत माहिती दिली. या ट्वीटमध्ये त्यांनी या भेटीचे व्हिडीओ पोस्ट केले. ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी उपस्थित राहून सदिच्छा भेट घेतली.”