पार्थ पवार यांच्या कोरेगाव पार्क जमीन घोटाळा प्रकरणावरून राज्यात सुरू असलेल्या चर्चांदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत त्यांची भूमिका स्पष्ट केली. एक रुपयाचा व्यवहार न करता कागद कसा काय तयार होतो? याचं आश्चर्य मलाही वाटल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.

एक रुपयाचा व्यवहार न करता कागद-अजित पवार

एक रुपयाचा व्यवहार न करता नुसते आकडे लिहून कसा काय कागद तयार होऊ शकतो? हे आजपर्यंत मला कळलेलं नाही. मी पण आश्चर्यचकीत झालो. ज्या रजिस्टर ऑफिसच्या व्यक्तीने ही नोंदणी केली, त्याने अशी नोंदणी कशामुळे केली? काय असं घडलं की त्यानं चुकीचं काम केलं? असे प्रश्न उपस्थित करत याविषयीची वस्तुस्थिती आपल्याला एका महिन्यात कळेल असे दादांनी सांगितले. त्यामुळे याप्रकरणात प्रशासकीय यंत्रणेकडे त्यांनी थेट बोट दाखवले आहे.

माझ्यावरही ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप झाला होता, पुढे काही झालं नाही-अजित पवार

मुख्यमंत्र्यांनी चांगले अधिकारी चौकशी समितीत घेतले आहेत, त्यामुळे महिन्याभरात वस्तूस्थिती समोर येईल. निवडणुका सुरू झाल्या की आमच्यावर आरोप सुरु होतात. कुठूनतरी, काहीतरी असं काहीतरी बाहेर आणलं जातं. तुम्हाला आठवत असेल तर २००८ किंवा २००९ मध्ये असंच माझ्याविरोधात ७० हजार कोटींचा आरोप झाला. त्याला १५ ते १६ वर्षे लोटली. त्यातून कुणीही काहीही पुरावे देऊ शकलं नाही. पण आमची बदनामी झाली. आता तर मीडियात प्रत्येक पक्षाचे प्रवक्ते आहेत. तेही बोलतात. चुकीची कुणी काही केलं आणि त्याबद्दल बोललं तर समजू शकतो. पण सकाळपासून रात्रीपर्यंत लोकांची कामं करायची. पारदर्शकता कशी राहिल ते बघायचं. नियमाला धरून सगळं करायचं. घटनेच्या चौकटीत राहून काम करायंच. चूक होणार नाही त्याची काळजी घ्यायची आणि लगेच बारामतीतील कुठल्या कुठल्या जमिनीचं काहीही काढायला लागले. माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाल्यापासून मी कुठलीही चुकीची गोष्ट होऊ देत नाही असे अजितदादांनी म्हटलं आहे.

निवडणुकांबाबत काय म्हणाले अजित पवार?

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, “सोमवार ते शुक्रवार आम्ही राज्याचा आढावा घेतला. बारामतीत चाचपणी केली. बारामती आघाडीवर लढली जायची ही परंपरा होती. पण मी सक्रिय झाल्यावर ठरवलं की पक्षाच्या नावावर लढायचं. पक्षविरोधी कृती झाल्यास कारवाई करता येते.” ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात नऊ वर्षांनी २८८ नगरपरिषद आणि पंचायत निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर मी बारामतीसह राज्यभर लक्ष ठेवून आहे. पुढच्या पाच वर्षांत शहराचा कायापालट करायचा आहे, ही जबाबदारी माझी आहे.” असंही अजित पवार म्हणाले.