Ajit Pawar on Rohit Pawar: ‘अजित पवार गावकीचा विचार करतात, पण भावकीला मात्र ते विसरले’, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यासमोरच विधान केले. सांगलीतील इस्लामपूर येथे महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त दोन्ही पवार एकत्र आले होते. यावेळी राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसचे नेते जयंत पाटील, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते.
रोहित पवार आपल्या भाषणात म्हणाले होते की, अजित पवार हल्ली गावकीचा विचार करतात. मात्र भावकीला ते विसरले. रोहित पवार यांच्या भाषणानंतर त्यांच्या आजी सरोज पाटील यांनी रोहित पवारांच्या भाषणाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, रोहित लहान वयात चांगले भाषण द्यायला लागला आहे. भाषणाच्या बाबतीत तो एन. डी. पाटील यांचा वारसा पुढे नेत आहे.
भावकीकडं लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास
रोहित पवार यांनी डिवचल्यानंतर अजित पवारांनींही आपल्या भाषणात यावर पलटवार केला. अजित पवार म्हणाले, “भावकीकडे लक्ष दिले म्हणूनच तू आमदार झालास. जयंतराव त्याला (रोहित पवार) विचारा किती मते पडली? पोस्टल बॅलेटमध्ये आपण (रोहित पवार) निवडून आला आहात. त्याच्यामुळे माझ्या नादी कुणी लागू नका.”
अजित पवार पुढे म्हणाले, “मी तुम्हाला काही बोलत नाही, तुम्ही मला काही बोलू नका. महायुतीमध्ये गेल्यापासून मी तुमच्यावर कधी टीका केली नाही. मी माझ्या विचाराने चाललो आहे, तुम्ही तुमच्या विचारांनी चालला आहात. शेवटी आपल्याला महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधायचा आहे.”
रोहित आता चुरूचुरू बोलायला लागलाय….
रोहित पवार यांच्या भाषणातील एका मुद्द्याचा संदर्भ देत अजित पवार यांनी रोहित पवार यांना चिमटाही काढला. मी एनडी पाटील यांच्या संस्थेसाठी ४० लाखांचा निधी देत आहे. या निधीवर एक शून्य वाढवून चंद्रकांत पाटील यांनी निधी द्यावा, असे रोहित पवार म्हणाले होते. यावर मिश्किलपणे बोलताना अजित पवार म्हणाले, बरं झाले रोहितने आमचे नाव घेऊन आणखी शून्य वाढवायला सांगितले नाहीत.
मी रोहितचे भाषण ऐकत होतो. खूप चुरूचुरू बोलायला लागला आहे, असे सांगून अजित पवारांनी स्वतःचे उदाहरण दिले. ते म्हणाले, “१९९० साली मी, जयंत पाटील, आर. आर. पाटील असे आमदार झालो. १९९०, १९९५ आणि १९९९ असे तीन टर्म लागोपाठ निवडून आल्यानंतरही १९९९ च्या आघाडी सरकारच्या काळात आम्हाला फार स्पेस मिळाली नाही. २००४ साली थोडी संधी मिळाली. पण हल्ली काही काही जणांना पहिल्या टर्मलाच भाषणबाजी करायची असते. मी म्हणजे कुणीतरी मोठा अशा अर्विभावात ते दुसऱ्या पक्षाला सल्ले देत फिरतात”
दोन दिवसांपूर्वीच रोहित पवार यांनी अजित पवारांच्या पक्षात कोकणातील नेत्याचे चालत असून अजित पवारांचे पक्षावर नियंत्रण राहिले नसल्याची टीका केली होती. या टीकेला अजित पवारांनी या भाषणातून उत्तर दिले.