सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्रतेची सुनावणी सुरू केली आहे. येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्याबरोबर गेलेले १६ आमदार अपात्र ठरतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर कुणाची वर्णी लागणार? याबाबत विविध तर्क लावले जात आहेत. मुख्यमंत्री पदासाठी अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
अशी एकंदरीत स्थिती असताना अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. २०२४ मध्ये अजित पवार जास्तीत जास्त आमदार निवडून आणतील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असं विधान अमोल मिटकरी यांनी केलं आहे. ते बारामतीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा – “युतीत ताकद दाखवावी लागेल, तरच…”, अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं मोठं विधान
अजित पवार मुख्यमंत्री कधी होतील? असा सवाल विचारला असता अमोल मिटकरी म्हणाले, “१४५ चा आकडा जोपर्यंत कुणाकडे येणार नाही, तोपर्यंत कुणीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाही. मग ते देवेंद्र फडणवीस असो, एकनाथ शिंदे असो किंवा अजित पवार असो… तुम्हीपण अजिबात घाई करू नका. अजित पवार हे २०२४ च्या निवडणुकीत जास्तीत जास्त आमदार निवडून आणतील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील.”