प्रबोध देशपांडे
अकोला : राज्यात वंचित बहुजन आघाडी व शिवसेना ठाकरे गटामध्ये आघाडी आहे, तसेच सत्तेत सहभागी होत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने भाजपशी हातमिळवणी केली. या राजकीय पक्षांमध्ये राज्यात मैत्री असली तरी जिल्ह्यात स्थानिक नेत्यांकडून मात्र एकमेकांवर कुरघोडी करण्याचे नेहमीच प्रयत्न केले जातात. याचा प्रत्यय अकोला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा आला.




शिवसेनेने वंचितला कोंडीत पकडले. याअगोदर राष्ट्रवादीने देखील भाजपवर टीका करून वाद ओढवून घेतला होता. राज्यात आघाडी करून वरिष्ठ नेते एकत्र आल्यानंतरही स्थानिक नेत्यांमध्ये मनोमिलन घडून आले नसल्याचे चित्र आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठे फेरबदल घडून आले. शिवसेनेमध्ये सातत्याने पडझड होत असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंशी मैत्री केली.
‘मविआ’ किंवा इंडिया आघाडीचा ‘वंचित’ घटक पक्ष नसला तरी त्यांची शिवसेना ठाकरे गटाशी आघाडी आहे. दोन्ही नेत्यांकडून तसे जाहीर करण्यात आले. अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भाग हा वंचित आघाडीचा गड. गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून अकोला जिल्हा परिषदेवर वंचितची सत्ता आहे. राज्यात वंचित व शिवसेना ठाकरे गटाची आघाडी असली तरी त्याचा परिणाम जिल्ह्यातील राजकारणावर कुठेही दिसून येत नाही. जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात वंचित आघाडी व शिवसेना ठाकरे गटाचा एकमेकांचे विरोधक म्हणूनच वावर आहे.
अकोला जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या भूमिकेमुळे वंचितची सत्ता अबाधित राहिली, तर शिवसेना ठाकरे गट विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहेत. जि.प.च्या सर्वसाधारण सभेत शिवसेना ठाकरे गटाने राज्यातील वंचितसोबतची आघाडी विसरत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून सत्ताधारी वंचितला अडचणीत आणले. हाता येथील जिल्हा परिषदेची शेतजमीन वहितीसाठी अत्यल्प दरात दिल्याचा मुद्दा शिवसेनेचे गटनेता गोपाल दातकर यांनी आक्रमकपणे उपस्थित केला. या प्रकरणावरून शिवसेना व वंचितच्या जि.प. सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे सभेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वंचित व शिवसेनेच्या राज्यातील मैत्रीला अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या बालेकिल्ल्यातच सुरुंग लागला आहे.
वंचित व शिवसेनेप्रमाणेच जिल्ह्यात भाजप व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे देखील सूत जुळले नाही. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी थेट भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार संजय धोत्रे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर भाजपने देखील आ.मिटकरींवर पलटवार केला होता. आ.मिटकरी सत्तेत सहभागी असतानाही त्यांनी भाजप खासदारांवर टीका केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. भाजपचे विद्यमान खासदार असल्यावरसुद्धा अमोल मिटकरींनी अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे अनेक वेळा अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी व भाजपमध्ये जुंपल्याचे चित्र दिसून येते. वंचित-शिवसेना व भाजप-राष्ट्रवादीत ज्या पद्धतीने टीकाटिप्पणी, आरोप-प्रत्यारोप होतात त्यावरून स्थानिक नेते एकत्र येण्याची सुतराम शक्यता वाटत नाही. राज्यात आघाडी असली तरी जिल्ह्यात शह-काटशहाचे राजकारण रंगण्याचीच चिन्हे आहेत.
अंतर्गत वाद
राज्यात वरिष्ठ स्तरावर सोयीस्कर आघाडय़ा करण्यात आल्या. जिल्हास्तरावर मात्र त्या आघाडय़ांचा सकारात्मक परिणाम दिसून आला नाही. त्यातच आगामी काळातील निवडणुकांमध्ये जागावाटपावरून सत्ताधारी व विरोधी पक्षातील आघाडय़ांमध्ये अंतर्गत ओढाताण होईल. वरिष्ठ स्तरावर आघाडी असली तरी जिल्ह्यात नेते एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यामुळे निवडणुकीत राजकीय पक्षांसह स्थानिक नेत्यांना आणखी अवघड जाणार आहे.