राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहवरील शेळद या गावाजवळ बुलढाणा अकोला मार्गावरुन जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने समोरुन धडक दिली. या अपघातामध्ये १४ जण जखमी झाले आहे. बस चालकासह आणखी दोन ते तीन जण गंभीर झाल्याची माहिती समोर येत आहे. ही टक्कर इतकी भीषण होती की अपघातानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतल्याने प्रवाशी भाजल्याचीही माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. जखमींना तातडीने जवळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
बुलढाणा आगारमधून निघालेली एम एच ४० एच क्यू ६१६० ही एसटी बुलढाण्यावरुन अकोल्याच्या दिशेने जाताना हा अपघात घडला. या अपघातात बसचालकाला गंभीर इजा झाली आहे. त्यासोबतच इतरही प्रवाशी जखमी झाले आहे. दरम्यान, दोन वाहनाच्या धडकेनंतर बसच्या इंजिनमध्ये तांत्रिक गडबड झाल्याने इंजिनने पेट घेतला. त्यामुळे प्रवाशांनी बाहेर पडण्यासाठी धडपड केली. बसच्या पुढील बाजूस आग लागल्याने अनेकांनी बसच्या मागील बाजूस असणाऱ्या आपत्कालीन खिडकीमधून बाहेर पडत स्वत:चा जीव वाचवला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र बसमधून तसेच ट्रकमधून सर्वजण बाहेर पडल्यानंतर ट्रकनेही पेट घेतला.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी पाठविले. तर दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, या अपघातातील जखमींची माहिती अद्याप कळू शकली नाही. तसेच बाळापूर पोलिस पुढील तपास करीत आहे.