अकोले: भक्ष्याच्या शोधात घरात घुसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात माय-लेक जखमी झाल्याची घटना तालुक्यातील देवठाण येथील काळे वस्तीवर घडली. दोन मुलांच्या धाडसामुळे आई बिबट्याच्या तावडीतून बचावली. या घटनेमुळे देवठाण व परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. किसनाबाई रामहारी काळे (वय ५७) व वैभव रामहारी काळे (वय २७) अशी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्याची नावे आहेत.
देवठाण येथील पाटाच्या कडेला असणाऱ्या काळे वस्तीवर रात्री एकच्या सुमारास भक्ष्याच्या मागे लागलेला बिबट्या दरवाजा तोडून थेट काळे यांच्या घरात घुसला. दरवाजाचा आवाज आल्यामुळे किसनाबाई उठल्या. त्यांनी बिबट्या पाहिल्यावर आरडाओरडा केला. बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. दरम्यान, त्यांची मुलेही जागी झाली. त्यांनी आईवरील हल्ला परतवून लावला. पण या हल्ल्यात बिबट्याचा पंजा लागल्याने किसनाबाई यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. डोक्यातून मोठा रक्तस्राव होत होता. उपचारानंतर त्यांच्या डोक्याला १० टाके पडले आहेत, तर वैभवच्या पाठीवर व हाताला बिबट्याचा दात लागल्याने तोही जखमी झाला.
या सर्व गोंधळात बिबट्या घराच्या आतील खोलीत शिरला. काही वेळ घरात थांबून होता. नंतर त्याने तेथून अलगद पोबारा केला. या घटनेची माहिती देवठाण गावचे माजी सरपंच अरुण शेळके यांना मिळताच त्यांनी वन विभागाशी संपर्क साधला. वन कर्मचारी अर्ध्या तासात घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळ व परिसराची पाहणी केली.
जखमींना उपचारासाठी देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून नंतर नाशिक येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेथून अकोले येथील खासगी रुग्णालयात पुन्हा आणण्यात आले आहे. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे देवठाण गाव व वस्ती परिसरात घबराट निर्माण झाली आहे.