अहिल्यानगर : अकोळनेर (ता. अहिल्यानगर) येथील जिल्हा पंचायत संसाधन केंद्रामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढून प्रशासन गतिमान होईल, अशी अपेक्षा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केली.
केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानअंतर्गत उभारण्यात आलेल्या जिल्हा पंचायत संसाधन केंद्राचा लोकार्पण सोहळा अकोळनेर येथे सभापती राम शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी सभापती शिंदे बोलत होते. आमदार काशिनाथ दाते, आमदार विक्रम पाचपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, निवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, अकोळनेरचे सरपंच प्रतीक शेळके आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री विखे म्हणाले, राज्यात केवळ अहिल्यानगर व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना जिल्हा पंचायत संसाधन केंद्रास राज्य सरकारची मान्यता मिळाली. प्रशिक्षण केंद्र उभारून कार्यान्वित करणारे अहिल्यानगर जिल्ह्यातील हे पहिलेच प्रशिक्षण केंद्र आहे. ही बाब जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरली आहे. प्रशिक्षण केंद्राची चांगल्या प्रकारे देखभाल करून सातत्याने हे प्रशिक्षण केंद्र सुरू राहील याची खात्री करावी.
प्रशिक्षणार्थींच्या क्षमतावृद्धीसाठी प्रयत्नशील राहावे. प्रास्ताविक सीईओ आनंद भंडारी यांनी केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांनी आभार मानले. आदिनाथ मोरे यांनी सूत्रसंचालन केले. या केंद्राच्या उभारणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने २ हेक्टर क्षेत्र उपलब्ध करून दिले. केंद्र व राज्य सरकार, जिल्हा परिषदेचा स्वनिधी, जिल्हा वार्षिक योजना अशा विविध माध्यमातून या केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.
