अलिबाग : अलिबाग वडखळ महामार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या मार्फत केले जाणार आहे. देवकर अर्थमुव्हर कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला आहे. मात्र प्रकल्पासाठी मंजुर किमतीपेक्षा ४३ टक्के कमी दराने या कामाची निविदा देण्यात आल्याने, या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
वडखळ अलिबाग राष्ट्रीय महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. रस्त्याची देखभाल दुरुस्ती न केल्याने सध्या महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अशातच यामार्गावरील अवजड वाहतुकीमुळे महामार्गाची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. त्यामुळे अर्ध्यातासाचे अंतर पार करण्यासाठी तब्बल दिड ते दोन तासांचा कालावधी लागतो आहे, खराब रस्त्यामुळे महामार्गावर वाहतुक कोंडीची समस्या उद्भवत आहे. पुर्वी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे देण्यात आला होता.
मात्र महामार्ग प्राधिकरणाकडून आता तो राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. हस्तांतरणाची प्रक्रीया पूर्ण न झाल्याने गेली तीन ते चार वर्ष रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम रखडले होते. आता ही प्रक्रीया पूर्ण झाल्याने रस्ता मजबुतीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. या कामाची निविदा प्रक्रीयाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे हे काम लवकरच सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र रस्त्याचे काम सुरु होण्या आधीच वादात सापडले आहे.
प्रकल्पासाठी मंजूर किमतीपेक्षा कमी दराने झालेली निविदा यास कारणीभूत ठरली आहे.अलिबाग ते वडखळ दरम्यानच्या कामसाठी महामार्ग विभागाने ४९ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. निविदा रक्कम ३९ कोटी ठेवंण्यात आली होती. ११ कंपन्यांनी या कामासाठी निविदा भरली होती. यात देवकर अर्थमुव्हर्स कंपनीची निविदा सर्वात कमी दराने आल्याने, त्यांना हे काम मंजूर करण्यात आले. २० ऑगस्टला मंजुर निधी पेक्षा ४३.८० टक्के कमी दराने म्हणजेच २२ कोटी १४ लाख रुपयांना हे काम मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे इतक्या कमी दरात २२ किलोमीटरचा रस्ता कसा पूर्ण होणार आणि कामाचा दर्जा कसा ठेवला जाणार याबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
मुळात जेव्हा एखाद्या कामासाठी कमी दराने निविदा प्राप्त होते. तेव्हा सदर निविदा मंजूर करण्यापूर्वी, निविदा भरणाऱ्या ठेकेदारांकडून या संदर्भातील लेखी खुलासा मागवणे गरजेचे असते. ४३ टक्के कमी दराने निविदा महामार्ग बांधकाम विभागाने ही निविदा मंजूर कशी केली हा मोठा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे ठेकेदार कामाचा दर्जा काय ठेवेल हा प्रश्नच आहे.
दिलीप जोग, खड्डे एक्टिविस्ट
मुळातच ठेकेदाराने हे काम ४३ टक्के कमी दराने घेतले आहे. त्याला या कामासाठी १८ टक्के जिएसटी भरावा लागणार आहे. अशा परिस्थिथीत ठेकेदार कामाचा दर्जा कसा ठेवणार हा अलिबागकरांना पडलेला मोठा प्रश्न आहे. महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे.
प्रविण ठाकूर, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस
महामार्गाच्या कामासाठी खुल्या निविदा मागवण्यात आल्या होत्या, त्यात ९ कंपन्यांनी कामासाठी निविदा भरल्या होत्या, सगळ्यात कमी बोली असल्याने हे काम देवकर अर्थमुव्हर्स कंपनीला देण्यात आले आहे. खुली स्पर्धा असल्याने कमी दराने निविदा येऊ शकतात.शैलेंद्र गुंड, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग