येत्या काही दिवसात देशात राष्ट्रपती निवडणूक होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं नेतृत्व करणाऱ्या भाजपाकडून द्रौपदी मूर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर विरोधीपक्षाकडून यशवंत सिन्हा हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना शिवसेनेनं पाठिंबा द्यावा, अशी मागणी काही शिवसेना खासदारांनी केली आहे. राष्ट्रपती निवडणुकीवरून खासदारांमध्ये खदखद सुरू असताना शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.

राष्ट्रपती निवडणुकीबाबत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “आजच्या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू आणि यशवंत सिन्हा दोघांबाबत चर्चा झाली. शिवसेनेनं यापूर्वी देखील अनेकदा राजकारणापलीकडे जाऊन व्यक्ती म्हणून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठबळ दिलं आहे. मग त्यामध्ये प्रतिभाताई पाटील असतील किंवा प्रणव मुखर्जी असतील, असे निर्णय शिवसेनेनं यापूर्वी घेतले आहेत. सर्व खासदारांनी याबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. पक्ष प्रमुखांचा जो आदेश आहे, तो आदेश सर्व सर्व खासदार आणि आमदारांसाठी बंधनकारक असेल,” असंही राऊत म्हणाले.

पदावरून हटवण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही, असा दावा बंडखोर आमदार संजय बांगर यांनी केला होता. याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “शिवसेना ही उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांची आहे, दुसरी कुणाचीही नाही. त्यामुळे पदावरून हटवण्याचे सर्व अधिकार पक्षप्रमुखांना आहेत. त्यानुसार त्यांना पदावरून हटवलं आहे. जर कुणाला वाटत असेल पदावरून हटवण्याचे अधिकार उद्धव ठाकरेंना नाहीत. तर तो त्यांचा भ्रम आहे.”

हेही वाचा – “…तर रक्ताचे पाट वाहिले असते”, शिवसेनेतील बंडखोरीबाबत अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांचं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुरूपोर्णिमेला बंडखोर आमदार मातोश्रीवर येतील का? असं विचारलं असता राऊत म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे आमच्या सर्वांचेच गुरू आहेत. त्यांच्यासारखा गुरू लाभणं आमचं भाग्य आहे. ते आम्हाला गुरू म्हणून लाभले आणि त्यांनी आम्हाला घडवलं, दिशा दाखवली, आम्हाला पुढे नेलं. एखाद्या महान गुरुप्रमाणे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यांनी शिवसेना निर्माण केली. अशा गुरूला मानवंदना देणं आमचं कर्तव्य आहे. आता उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत, ते सुद्धा आमच्या गुरूस्थानी आहेत. शिवसेनेचं नेतृत्व जो कोणी करतो, तो आमच्या गुरुस्थानी असतो,” असंही राऊत यावेळी म्हणाले.