सातारा: जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर राहणार आहे, अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

खटाव तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा शिरसवडी येथील नव्याने बांधण्यात येणाऱ्या सात वर्ग खोल्यांचे व पळशी येथील जिल्हा परिषद आदर्श शाळा येथील नऊ खोल्यांचे भूमिपूजन मंत्री गोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, गटविकास अधिकारी योगेश कदम, अंकुश गोरे, गट शिक्षणाधिकारी सोनाली विभुते, अनिल माने, भरत जाधव, बंडा गोडसे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिरसवडी व पळशी येथील शाळेच्या नवीन खोल्यांचे बांधकाम चांगल्या पद्धतीने व वेळेवर करावे, असे सांगून मंत्री श्री. गोरे म्हणाले, जिल्हा परिषदेत शाळेतील शिक्षकांनी शाळेतील पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करावेत. शाळांना सर्व सुविधा शासनामार्फत दिल्या जातील. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये चांगले शिक्षण दिले जाते याबाबत नागरिकांचा विश्वास संपादन करावा. खासगी शाळांच्या स्पर्धेत कुठेही मागे राहू नये यासाठी सर्व शाळा आदर्श शाळा करण्यावर भर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

माण तालुक्यातील रस्ते, वीज, पाणी, शिक्षण या बाबींवर भर देण्यात आला असून विकास कामांसाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही. गावकऱ्यांनी शाळेच्या कामकाजात योगदान दिले त्या शाळा आदर्श शाळा झाल्या आहेत व या शाळेमध्ये पटसंख्याही वाढली आहे, हे अनेक शाळांनी दाखवून दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिरसवडी व पळशी येथील ग्रामस्थांनी शाळेमध्ये योगदान देऊन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळेल हे पाहण्याबरोबरच शाळेला विविध माध्यमातून मदत करावी, असेही मंत्री गोरे यांनी सांगून विविध संस्थांमध्ये उच्च पदावर जिल्हा परिषदेतील शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यरत आहे. नागरिकांनीही आपल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये घ्यावा, असेही आवाहन गोरे यांनी केले.