अर्थसंकल्पाला स्थायी समितीची मंजुरी; भाजपला शिवसेनेची साथ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी भाजप-शिवसेना युतीच्या घोषणेनंतर मीरा-भाईंदर  पालिकेत शिवसेनेने भाजपविरोधी भूमिका बदलून सत्ताधारी पक्षाच्या बाजूने मतदान केले.

स्थायी समितीत आगामी वर्षांच्या अंदाजपत्रकाला मान्यता देताना गुरुवारी विरोधी पक्षातील शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला. प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकात स्थायी समितीच्या बैठकीत सुमारे ८० कोटी रुपयांची वाढ केली. या वाढीला काँग्रेसने विरोध केला आहे.

भाजपसोबत कधीही युती न करण्याची घोषणा केल्यापासून मीरा भाईंदरमध्ये स्थानिक पातळीवर देखील दोन्ही पक्षात वितुष्ट आले होते. महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढले. त्यामुळे भाजपने महापालिकेत एकहाती सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेना विरोधी पक्षात बसली.

सध्या विरोधी पक्षनेता शिवसेनेचाच आहे. गेल्या दीड वर्षांत पालिकेच्या होत असलेल्या मासिक सभांमधूनही दोन्ही पक्षांत वितुष्ट होते. प्रत्येक सभेत भाजपने आणलेल्या प्रस्तावांना काँग्रेसच्या सोबतीने शिवसेनेकडून कडाडून विरोध करण्यात येत होता.

काही दिवसांपूर्वीच झालेल्या महासभेत सत्ताधारी भाजपने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कलादालनाविषयी आणलेल्या प्रस्तावावरुन शिवसेनेने महासभेत रणकंदन माजवले होते. आक्रमक  शिवसेनेने भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सभागृहातील ध्वनिक्षेपकाची तोडला होता.

मात्र भाजप-शिवसेना यांच्यात नव्याने युती झाल्यानंतर मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत  सेनेने भाजपला साथ दिली.

प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकात सत्ताधारी भाजपने सुमारे ८० कोटी रुपयांची वाढ सुचवली आहे.

मालमत्ता कर, मोकळ्या जागांवरील कर आणि विकास कर मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या प्रशासनाने सूचविलेल्या आकडेवारीपेक्षा अधिक वसुल होऊ शकतो, असे सांगत सत्ताधारी भाजपने ही वाढ केल्याची स्पष्ट झाले आहे.

काँग्रेसचा करवाढीला विरोध

विरोधी पक्षातील काँग्रेसने या वाढीला कडाडून विरोध केला. दरवर्षी कराच्या आकडेवारीत वाढ केली जाते, परंतु आयुक्तांनी वर्तवलेले अंदाजच अखेर खरे ठरत असतात, अशी बाजू मांडून काँग्रेसने अंदाजपत्रकात वाढ करण्यास जोरदार विरोध केला. मात्र शिवसेनेने नेहमीप्रमाणे काँग्रेसची साथ न देता सत्ताधारी भाजपच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे महापालिकेतही शिवसेनेने भाजपसोबत सहकार्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी शिवसेनेची बाजू ऐकून घेण्यासाठी गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांच्याशी संपर्क साधला परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alliance in mira bhayander corporation
First published on: 22-02-2019 at 00:21 IST