सरकारी रुग्णालयाच्या दुरावस्थेमुळे किंवा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना बरेचदा गैरसोयीचा सामना करावा लागतो. रुग्णालयात उपचार घेताना अशाच प्रकारच्या गैरसोयीचा सामना औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांना करावा लागला. उपचारादरम्यान लाईट गेल्यामुळे झालेल्या मंत्र्यांच्या गैरसोयीनंतर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाला जनरेटर मंजुर करण्यात आले. यावरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षेनेते अंबादास दानवे यांनी सडकून टीका केली आहे.
“सरकारमधील मंत्र्यांना सत्तेचा माज,” शिंदे गट-भाजपा सरकारविरोधात अंबादास दानवे आक्रमक
“सर्वसामान्य लोकांच्या लाईट गेल्यामुळे कितीतरी वेळा शस्त्रक्रिया थांबतात. परंतु आमच्या मंत्री महोदयांना त्रास झाल्याबरोबर त्यांनी रुग्णालयाला तात्काळ जनरेटर दिले. तेव्हा आता सर्व रुग्णालयांमध्ये या मंत्र्यांना घेऊन जावं का? आणि तेव्हाच प्रश्न सुटतील का? असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला आहे.
औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे शहरातील सरकारी रुग्णालयामध्ये दंतोपचार घेण्यासाठी गेले होते. त्याचवेळी लाईट गेल्याने मोबाईलच्या टॉर्चच्या साहाय्याने त्यांना उपचार घ्यावे लागले. मंत्र्यांच्या गैरसोयीनंतर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाला जनरेटर मंजुर करण्यात आले आहे.
“शस्त्रक्रिया सुरु असताना अनेकदा लाईट गेल्याच्या घटना औरंगाबादेत घडल्या आहेत. त्यावेळी काय घडलं असेल हे परमेश्वराचालाच ठाऊक असेल. या समस्येमुळे कितीतरी वेळा शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे रुग्णांना तारीखदेखील मिळत नाही. भारनियमनाच्या या समस्येकडे गांभीर्याने पाहिलं जात नाही” असा आरोप दानवे यांनी केला आहे.