अंबर दिवा वापरण्यास प्रतिबंध केला असला तरी येथील जिल्हाधिका-यांच्या नव्या को-या गाडीवर अंबर दिवा झळकत आहे. जिल्हाधिका-यांनाच अंबर दिव्याचा सोस पडल्याने या दिव्याच्या गैरवापराला रोखणार कोण, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकाराला प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेने विरोध दर्शविला असून शुक्रवारी संघटनेने प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांच्याकडे तक्रारीचे निवेदन दिले आहे. विशेष म्हणजे दराडे यांनी राज्य शासनाच्या अधिसूचनेबरहुकूम आपल्या गाडीवर निळा दिवा लावला असून जिल्हाधिका-यांच्या गाडीवरील अंबर दिव्याबाबत त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे.
लाल, अंबर दिव्यांचा वापर केल्यामुळे गैरप्रकार घडले आहेत. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेवर निकाल देताना न्यायालयाने केंद्र व राज्य शासनाला नियमात बदल करण्यास भाग पाडले आहे. राज्य शासनाने याबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. तरीही अद्याप अंबर दिव्यांचा बेकायदेशीर वापर सुरू असल्याचे आढळून आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात अद्याप पासिंग न झालेली नवीन गाडी (एम. एच. ०९-टी. सी. १५६१)उभी होती. यावर अंबर दिवा लावण्यात आला असून ही गाडी जिल्हाधिकारी वापरत असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच महालक्ष्मी मंदिरात शुक्रवारी अकरा वाजण्याच्या सुमारास पासिंग न झालेली नवीन गाडी (तात्पुरता क्रमांक एम. एच. ०९ टी. सी. १३०६) आढळून आली असून त्यावरही अंबर दिवा प्रदर्शित केला होता. ज्या वाहनांचे अद्याप पासिंग झालेले नाही, क्रमांक मिळालेला नाही, परिवहन आयुक्तांनी स्टिकर दिलेले नाही त्या वाहनांवर अंबर दिवे प्रदर्शित करणे हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे अशा वाहनांवर अधिसूचनेतील तरतुदीनुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रजासत्ताक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई, सचिव बुरहाण नाईकवाडी यांनी प्रादेशिक परिवहन अधिका-यांकडे केलेली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd May 2014 रोजी प्रकाशित
कोल्हापूर जिल्हाधिका-यांच्या नव्या को-या गाडीवर अंबर दिवा
अंबर दिवा वापरण्यास प्रतिबंध केला असला तरी येथील जिल्हाधिका-यांच्या नव्या को-या गाडीवर अंबर दिवा झळकत आहे. जिल्हाधिका-यांनाच अंबर दिव्याचा सोस पडल्याने या दिव्याच्या गैरवापराला रोखणार कोण, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
First published on: 03-05-2014 at 03:53 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amber light on the new car of kolhapur collector