Amit Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे राजकारणी असल्याबरोबरच एक उत्तम व्यंगचित्रकार आहेत. त्यांचे काका बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच त्यांची व्यंगचित्रावर चांगली पकड आहे. तसेच त्यांचे वक्तृत्वही मराठीमनाची पकड घेणारे आहे. आजोबा आणि वडील यांचा वारसा पुढे नेत असताना अमित ठाकरे यांनीही राजकारणासह कलेत योगदान देण्याचा प्रयत्न केला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना माहीम विधानसभा मतदारसंघात यश मिळू शकले नव्हते. या पराभवानंतर ते पुन्हा एकदा पक्षबांधणीचे प्रयत्न करत आहेत. नुकतेच पुण्यातील बालगंधर्व येथे आयोजित केलेल्या व्यंग चित्रप्रदर्शनाला त्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांनी राज ठाकरेंचा सल्ला ऐकला नसल्याबाबत भाष्य केले.

अमित ठाकरे म्हणाले की, मी लहान असताना माझ्या वडिलांनी मला सल्ला दिला होता की, दिवसभरात मी काहीही केले तरी किमान एक तास व्यंगचित्रासाठी द्यावा. पण मी वडिलांचा सल्ला ऐकला नाही. मी कधी कधीच व्यंगचित्र काढायला बसायचो. व्यंगचित्र ही अशा कला आहे जी शिकून येत नाही, ती आत असावी लागते. माझे अनेक मित्र चित्रकला शिकले आहेत. ते व्यंगचित्र काढण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना ते जमत नाही.

“आज मला इथे बघून आनंद झाला की, अनेक लहान मुले आपली कला सादर करत आहेत. माझ्या वडिलांनी मला जो सल्ला दिला, तोच मी तुम्हाला देईल. तुम्ही कितीही व्यस्त असाल तरी दिवसातून एक तास व्यंगचित्राचा सराव करा. मी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचेही अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी हा अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला”, असेही अमित ठाकरे म्हणाले.

दरम्यान ऑपरेशन सिंदूरनंतर राज ठाकरे यांनी जशी प्रतिक्रिया दिली होती. त्याच प्रकारची प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनीही दिली. माध्यमांनी काल त्यांना ऑपरेशन सिंदूरबद्दल विचारले असता ते म्हणाले, भारतीय सैन्याचे कौतुक केले पाहिजेच. सर्वांनाच भारतीय सैन्याचा अभिमान आहे. पण मला जेवढे दुःख पहलगामच्या हल्ल्यानंतर झाले, तेवढा आनंद किंवा समाधान एअर स्ट्राईकच्या कारवाईनंतर झाला नाही. कारण पहलगाममध्ये हल्ला करणारे अतिरेकी अजूनही मोकाट आहेत. ते अतिरेकी मारले जातील, तेव्हाच न्याय मिळेल.

२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगामवरील हल्ल्याबाबत बोलत असताना अमित ठाकरे म्हणाले की, राज ठाकरे म्हणाले तसे युद्ध हे उत्तर नाही. पण पहलगाममध्ये अतिरेकी आलेच कसे? हा प्रश्न विचारायला नको का? आपण आता प्रत्युत्तर देतोय ते ठिक आहे. पण २५ जणांना मारायला अतिरेकी आत आलेच कसे? हे विचारावे लागेल. यंत्रणेचे अपयश आहे. पण सैन्यांना आपण सलाम केला पाहिजे.