आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी देशभर मोर्चेबांधणी करत आहे. एका बाजूला इंडिया आघाडीतले पक्ष आपसात जागावाटप करण्यासंदर्भात चर्चा करण्यात व्यस्त आहेत. तर दुसऱ्या बाजूला भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये विरोधी पक्षांमधून नेत्यांचं इनकमिंग चालू आहे. भाजपाप्रणित एनडीए प्रत्येक लोकसभा मतदारसंघ मजबूत करण्यावर लक्ष देत आहे. गेल्या काही महिन्यांत विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांनी भाजपात आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे देशात एनडीएची ताकद वाढू लागली आहे. दोन महिन्यांपूर्वी बिहारमधील भाजपाचे जुने सहकारी नितीश कुमारही एनडीएत परतले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला आहे. दरम्यान, आता महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती करणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संयुक्त शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची तीन दशकांहून अधिक काळ युती होती. उभय पक्षांच्या युतीने राज्यात अनेक वेळा सत्तास्थापन केली. भाजपाने केंद्रात स्थापन केलेल्या अनेक सरकारांमध्ये शिवसेनेला स्थान दिलं होतं. सध्या शिवसेनेचा शिंदे गट एनडीएचा सदस्य आहे. अशातच उद्धव ठाकरे यांची एनडीएत परतण्याची इच्छा असेल तर भाजपा त्यांचं स्वागत करेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे (शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष) आणि भाजपाची जुनी मैत्री आहे. हे दोन मित्र पुन्हा एकत्र येतील का? यावर राजकीय विश्लेषक आणि प्रसारमाध्यमांकडून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात असतात. अशातच या चर्चेवर अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, टीव्ही ९ नेटवर्कच्या वार्षिक कॉन्क्लेव्हमध्ये अमित शाह बोलत असताना त्यांना उद्धव ठाकरेंबाबत प्रश्न विचारण्यात आलं. भाजपाने त्यांचा जुना सहकारी नितीश कुमार यांना एनडीएत घेतलं आहे. त्याचप्रमाणे एनडीए सोडून गेल्या उद्धव ठाकरेंची एनडीएत परतण्याची इच्छा असेल तर भाजपा त्यांचं स्वागत करेल का? असा प्रश्न शाह यांना विचारण्यात आला. यावर शाह म्हणाले, या जर-तरच्या चर्चेला काहीच अर्थ नाही. तुम्ही असा प्रश्न मला विचारून तुम्हाला हेडलाईन मिळणार नाही. तुम्ही मला आगामी निवडणुकीबाबत प्रश्न विचारा. अन्यथा तुमची वेळ संपेल. शाह यांनी एकप्रकारे उद्धव ठाकरेंबाबतच्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं.

बिहारमध्ये भाजपा आणि एनडीएने परत एकदा युती केली आहे. त्यामुळे बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीत युतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल किंवा एनडीए बिहारमध्ये कोणाच्या नेतृत्वात निवडणूक लढेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हाच प्रश्न अमित शाह यांनादेखील विचारण्यात आला. त्यावर गृहमंत्री म्हणाले, विधानसभा निवडणुकीला अद्याप वेळ आहे. आत्ता आम्ही लोकसभा निवडणूक लढणार आहोत. त्यामुळे आत्ता तुम्ही लोकसभेबाबत बोला. विधानसभेच्या वेळी आम्ही दोन पक्ष एकत्र बसून सर्वकाही ठरवू. तुम्ही प्रसारमाध्यमांनी काही गोष्टी आमच्यावर सोडायला हव्यात. सगळं काही तुम्हीच ठरवणार का?

हे ही वाचा >> “मनोज जरांगे शरद पवारांची स्क्रिप्ट वाचतायत”, फडणवीसांच्या आरोपांवर पवार म्हणाले, “मी आंतरवालीला जाऊन…”

भाजपा-उबाठा युती होणार का? फडणवीस म्हणाले…

दरम्यान, उद्धव ठाकरेंबाबतच्या प्रश्नावर अलीकडेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं होतं. फडणवीस म्हणाले होते, आमच्यातली सध्याची परिस्थिती अशी आहे की आमची मनं दुखावली आहेत. उद्धव ठाकरे यांचा आमच्याबरोबर ज्याप्रकारचे व्यवहार राहिला आहे, ज्या प्रकारे खालच्या स्तरावर जाऊन ते सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतात, या सगळ्या गोष्टींनी आमची मनं दुखावली गेली आहेत. जिथे मनं दुखावतात तिथे युती होत नाही. राजकीय मतभेद असतील तर ते दूर करून युती होते. परंतु, जिथे मनं दुरावलेली असतात, तिथे एकत्र येणं कठीण असतं आमची मनं दुरावली आहेत. यात शंका नाही.