राहाता :केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शहा यांच्या लोणी व कोपरगाव येथे उद्या, रविवारी होणाऱ्या सभांसाठी भाजपने शक्तिप्रदर्शन करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी भाजपमधीलच परस्परविरोधी गट असलेले जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व कोपरगावमधील भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे या दोघांनी जय्यत तयारी केली आहे.

विखे व कोल्हे यांचे सुरुवातीपासून राजकीय वितुष्ट आहे. त्यातच संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी युती करून विखे यांच्या ताब्यातील गणेश साखर कारखान्याची सत्ता हस्तगत केल्याने विखे व कोल्हे यांच्यामधील राजकीय वैमनस्य वाढले आहे. वेळप्रसंगी विखे व कोल्हे एकमेकांचे नाव ———-घेता अप्रत्यक्ष परस्परांवर टीका करतात. विवेक कोल्हे यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी भाजपचे काही नेते प्रयत्नशील आहेत. मंत्री विखे यांना शह देण्याचा हेतू यामागे असल्याची चर्चा आहे. अमित शहा यांनी केवळ विखे यांचा लोणी व प्रवरानगर येथील कार्यक्रम स्वीकारला होता. ऐनवेळी कोल्हे यांचा कोपरगाव येथील कार्यक्रमाचा दौऱ्यात समावेश करण्यात आला.

त्या तुलनेत राधाकृष्ण विखे राज्याच्या राजकारणात प्रबळ झालेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राधाकृष्ण विखे यांनी राज्यातील साखर कारखान्यांच्या आयकर माफ करण्याच्या प्रश्नाची विखे यांनी शहा यांच्या माध्यमातून केलेली सोडवणूक तसेच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उपसमितीच्या अध्यक्षपदी लागलेली वर्णी व हा प्रश्न सोडविल्याबद्दल विखे यांनी त्यांची निवड सार्थ करून दाखविल्याने त्यांचे राजकीय वजन वाढले आहे.

शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे यांनी अहिल्यानगर येथे दक्षिण भागातील तर प्रवरानगरला उत्तर भागातील भाजप कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले तर डॉ. सुजय विखे यांनी शिर्डी व परिसरात बैठका घेतल्या. शिर्डी, प्रवरानगर व लोणी येथे स्वागताच्या कमानी तसेच पक्षाचे ध्वज लावून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. कोल्हे यांनीही ऐनवेळी शहा- फडणवीस यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोल्हे व विखे जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे दिसून येत आहे.

‘डिनर डिप्लोमसी’

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह राज्याच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री शनिवारी रात्री शिर्डी विमानतळावर शहा याचे स्वागत करणार असून हे सर्वजण शिर्डीतच मुक्कामी थांबून एकत्रित भोजन घेणार आहेत. या ‘डिनर डिप्लोमसी’मध्ये शहा व फडणवीस यांच्या उपस्थितीत राजकीय विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.