राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांचे शिरूर लोकसभा मतदारसंघात भावी खासदार म्हणून बॅनर लागले आहेत. माजी आमदार विलास लांडे यांचा आज वाढदिवस असून त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावी खासदार असा उल्लेख करत विलास लांडे यांचे बॅनर भोसरीमध्ये लावले आहेत. २०१९ मध्ये शिरूर लोकसभेसाठी विलास लांडे इच्छुक होते. परंतु, ऐनवेळी शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले सध्याचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली होती. त्या वेळी कोल्हे यांनी शिवाजी आढळराव पाटील यांचा दारुण पराभव करत शिरूरमधून खसदारकी मिळवली होती. परंतु आता लांडे पुन्हा एकदा शिरूरमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, शिरूर मतदार संघावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असताना विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांची भूमिका मांडली. अमोल कोल्हे म्हणाले, शिरूर मतदारसंघातील संभाव्य लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीविषयी तर्क वितर्क लढवले जात आहे. मला अनेकजण विचारणा करत आहेत, माध्यमांवर यावर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. परंतु यासंदर्भात मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की, २०१९ साली पवार साहेबांच्या आशीर्वादाने आणि शिरूरमधील मतदारांच्या पाठिंब्यावर लोकसभेत मी प्रतिनिधीत्त्व करत असताना मतदारसंघात कामी केली.

अमोल कोल्हे म्हणाले, या मतदार संघात तीन महत्त्वाचे मुद्दे होते. पहिला मुद्दा म्हणजे पुणे-नाशिक महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी. यावर उपाय म्हणून पाच बायपास रोड मंजूर होऊन सुरू झाले आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे मुळशी ते चांडोली एलिव्हेटेड कॉरीडोरमुळे चाकण चौकातली वाहतूक कोंडीपासून सुटका मिळणार आहे. हा प्रकल्प ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरू होईल. आपण बैलगाडा शर्यतीचा मुद्दादेखील सोडवला. तिसरा मुद्दा म्हणजे पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प पाठपुरावा करून भूसंपादनापर्यंत आणला आहे. आता केवळ मंत्रिमंडळाकडून परवानगी मिळणं बाकी आहे.

हे ही वाचा >> “मी भाजपाची, पण पक्ष माझा नाही”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया; म्हणाले, “गोपीनाथ मुंडेंनाही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिरूर लोकसभेच्या उमेवारीविषयी खासदार अमोल कोल्हे म्हणाले, माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी, मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाला, ज्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, अशा मुलाने एखाद्या मतदार संघावर कुठलाही दावा करणं किंवा छातीठोकपणे सांगणं तर्कसंगत नाही. या सगळ्या चर्चांवर माझं एकच उत्तर आहे. शरद पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण असेल आमच्यासाठी.