राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील आमदार रोहित पवार हे सातत्याने राज्य सरकारच्या कारभारावर आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका करत आहेत. अलीकडेच प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, “मी चूक केली असती, तर अजित पवारांबरोबर गेलो असतो आणि भाजपाच्या मांडीला मांडी लावून बसलो असतो.” रोहित पवारांच्या या वक्तव्यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता, अजित पवार म्हणाले, “बच्चा आहे, बच्चाबद्दल जास्त बोलायचं नसतं, त्याला आमचे कार्यकर्ते आणि प्रवक्ते उत्तर देतील”

अजित पवारांच्या वक्तव्यानंतर त्यांच्या गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी रोहित पवारांना त्यांचं नाव न घेता टोला लगावला आहे. अमोल मिटकरी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, बालमित्र मंडळाच्या अध्यक्षाला गगनाला गवसणी घालण्याचे डोहाळे लागलेले दिसतात. या अध्यक्षांनी भाजपासोबत जाण्यासाठी पवार साहेबांना (शरद पवार) अनेक वेळा गळ घातली. आता स्वतःला पुरोगामी सिद्ध करायला वाट्टेल ते करायला तयार आहेत. शिर्डीच्या अधिवेशनात बोलू न दिल्याने अध्यक्ष फारच चिडले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीच्या बारामती आणि पुणे येथील कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी छापे टाकले. यावरून रोहित पवार यांनी भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गटावर टीका केली. ते म्हणाले, सत्तेतील मोठ्या आवाजात बोलणाऱ्या नेत्यांना एवढंच सांगणं आहे की, मी विदेशात होतो. मी जर चूक केली असती, तर भारतात आलोच नसतो. खरी चूक केली असती, तर आज अजित पवारांबरोबर भाजपासोबत गेलो असतो. परंतु, आमच्यासाठी विचार, महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राची अस्मिता अधिक महत्त्वाची आहे.

रोहित पवारांच्या वक्तव्याबद्दल पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवारांना विचारलं. त्यावर अजित पवार म्हणाले, “बच्चा आहे, बच्चाबद्दल जास्त बोलायचं नसतं. त्याच्या प्रश्नाला उत्तरं द्यावीत, एवढा मोठा झाला नाही. माझे कार्यकर्ते आणि प्रवक्ते त्याला उत्तर देतील.”

हे ही वाचा >> “शिंदे आणि अजित पवार गटाचे उमेदवार दिल्लीतून…”, संजय राऊत यांचे मोठे विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित पवारांनी दिलं प्रत्युत्तर

अजित पवारांच्या टीकेनंतर आमदार रोहित पवार यांनी ‘एक्स’वर ‘दो कलियाँ’ या हिंदी चित्रपटातील ‘बच्चे, मन के सच्चे’ या गाण्याचा व्हिडीओ शेअर करत अजित पवारांना टोला लगावला आहे. “बच्चा है पर मन का सच्चा है! दिल है साफ, नफरत से है दूर…”, अशा गाण्याच्या पंगती त्यांनी लिहिल्या आहेत.