राष्ट्रवादी काँग्रसचे खासदार अमोल कोल्हे यांची ‘शेतकरी सन्मान यात्रे’ची सभा बारामतीतील काटेवाडीत पार पडली. यावेळी अमोल कोल्हेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं. “वाघ जंगलात फिरताना आपल्याला तो राजा वाटतो. पण, सर्कशीत रिंगमास्टच्या इशाऱ्यावर कसरती करताना आपल्या काळजाला वेदना होतात,” असं म्हणत अप्रत्यक्षपणे अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर हल्लाबोल केला. याला अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अमोल कोल्हे काय म्हणाले?
“वाघ आपल्याला खूप आवडतो. वाघ जंगलात फिरताना आपल्याला तो राजा वाटतो. मात्र, सर्कशीत रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर वाघ कसरती करताना आपल्या काळजाला वेदना होतात. कारण, ज्या वाघावर मी जीवापाड प्रेम केलं, त्याला रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर चालावं लागतं. जेव्हा हाच वाघ पिंजऱ्यात उभे राहिलेला बघतो, तेव्हा काळजाला वेदना होतात. या वाघाच्या डरकाळीनं भल्याभल्यांचा थरकाप उडत होता. आज त्याला पिंजऱ्यात गुरगुरावं लागतं. कुणीही येणारे जाणारे त्याला दगड मारू शकते. महाराष्ट्राच्या हितासाठी वाघाची डरकाळी फोडणारे जेव्हा दिल्लीच्या इशाऱ्यावर तोंडातून शब्द काढत नाही, तेव्हा ही भावना नक्कीच जागी होती,” असा टोला अमोल कोल्हेंनी अजित पवारांना लगावला होता.
हेही वाचा : “काही लोक अमोल कोल्हेंना पराभूत करण्याची भाषा करतात, पण…”, जयंत पाटलांनी अजित पवारांना ठणकावलं
“कोल्हेंच्या उत्तुंग बुद्धिमत्तेवर हसावं वाटतं”
यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, “अमोल कोल्हेंसारख्या अतिसामान्य व्यक्तीला शिरूरमध्ये निवडणूक लढायला लावत अजित पवारांनी वाघ बनवलं. आता अमोल कोल्हेंनी काटेवाडीत जाऊन अजित पवारांची सर्कशीतील वाघाशी तुलना करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कोल्हेंच्या उत्तुंग बुद्धिमत्तेवर हसावं वाटतं. कोण सर्कशीतलं आणि कोण जंगलातलं हे दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत माहिती आहे.”
हेही वाचा : अजित पवारांच्या आव्हानाचं दडपण आहे का? अमोल कोल्हे म्हणाले…
“अजित पवारांशी बरोबरी करू नका”
“अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळेंना संघर्ष यात्रा काढावी लागत असेल, तर हेच अजित पवारांचं वेगळेपण आहे. अजित पवारांनी अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळेंना कामावं लावलं आहे. अजित पवारांवर बोलताना थोडं सबुरीनं घ्यावं. बारामतीची लोक फार हुशार आहेत. येणाऱ्या काळात काय केलं पाहिजे, हे बारामतीची लोकांना माहिती आहे. त्यामुळे Wait अँड Watch… अजित पवारांशी बरोबरी करू नका,” असा इशारा अमोल मिटकरींनी अमोल कोल्हेंना दिला आहे.