देशभरात ‘द केरला स्टोरी’ या हिंदी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटावरून देशात राजकारणही जोरात सुरु आहे. असं असतांना आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंचर जिल्ह्यात लव्ह जिहाद प्रकरण घडल्याचा दावा केला आहे. पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना समोर आणत त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली आहे. तसेच लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. “राज्यात लव्ह जिहादच्या घटना घडल्या नाहीत, मला लव्ह जिहाद माहिती नाही असं म्हणणारे पीडित तरुणीला आणि कुटुंबीयांना भेटून त्यांच्या भावना जाणून घेणार का असा प्रश्न विचारत पडळकर यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे.

पडळकर सातत्याने सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत आहेत. त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलं आहे. अमोल मिटकरी टीव्ही ९ मराठीशी बोलताना म्हणाले, पवार कुटुंबावर बोलण्यासाठी सुपारी घेतलेले सुपारी बहाद्दर भाजपामध्ये आहेत. त्यातला हा एक गोपीचंद पडळकर. यांना सांगितलं आहे शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, रोहित पवार यांच्यावर तू बोलायचंस. मग तुझी कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा >> “युतीत जागा मिळाली तर ठिक, नाहीतर…”, अमरावती लोकसभेसाठी बच्चू कडू आक्रमक, रवी राणांच्या वक्तव्यावर म्हणाले…

अमोल मिटकरी म्हणाले, पण या पडळकरला ज्ञान नाही की, कॅबिनेटमध्ये जायला अक्कल आणि बुद्धी लागते. कितीही जहरी टीका केली तर जहर ओकणाऱ्याला कॅबिनेटमध्ये स्थान दिलं जात नाही. किमान तेवढी लाज शरम भाजपात असेल तर ते या वाचाळविरांना गप्प करतील. नितेश राणे असतील किंवा हे महोदय (गोपीचंद पडळकर) असतील यांच्यात कॅबिनेट मंत्रीपदासाठी स्पर्धा सुरू आहे. जितकं खालच्या पातळीवर बोलता येईल तेवढं बोलण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरू आहे.