गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आठवड्याभरात तीनवेळा लोकप्रतिनिधींवर जीवघेणे हल्ले झाले. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकरणांमुळे लोकप्रतिनिधीच सुरक्षित नसल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे. तर, दुसरीकडे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरही काल भाजपा कार्यकर्त्यांकडून हल्ला झाला. यासर्व प्रकारांमुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काही दिवसांपूर्वी उल्हासनगरात भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला. याप्रकरणातील जखमी महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, तीन दिवसांपूर्वी टोळक्याने केलेल्या गोळीबारात जखमी चाळीसगाव येथील भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र ऊर्फ बाळू मोरे यांचा शनिवारी मृत्यू झाला. तसंच, गुरुवारी रात्री ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. एका आठवड्यात या तीन दुर्दैवी घटना घडल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस रडारवर आले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी वाढू लागली आहे. यावर उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या, “महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राखणं गरजेचं आहे. मला पूर्णपणे खात्री आहे की देवेंद्र फडणवीस कायदा सुव्यवस्था राखण्यास तत्पर आहेत. महाराष्ट्रात पूर्णपणे लक्ष घालून शांतता राहावी याकरता ते प्रत्येक गोष्ट करतील. “

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुक्रवारी सायंकाळी निखिल वागळे यांच्यावर पुण्यात जीवघेणा हल्ला झाला. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात काही महिला कार्यकर्त्याही जखमी झाल्या आहेत. राष्ट्रसेवा दलाकडून निर्भय बनो या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी नव्हती. तसंच, भाजपाचाही या कार्यक्रमाला विरोध होता. तर निखिल वागळे यांच्या एका वक्तव्यावरून त्यांच्यावर नुकताच गुन्हाही दाखल झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला होण्याची दाट शक्यता होती. या पार्श्वभूमीवरही ते कार्यक्रमस्थळी पोहोचले आणि त्यांच्यावर हल्ला झाला. या प्रकाराबाबत अमृता फडणवीसांना विचारले असता त्या म्हणाल्या, निखिल वागळे यांच्यावर खूपदा हल्ले झाले आहेत. ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खूप दुरुपयोग करतात. लोकही त्यांच्या अधिकारांची दुरुपयोग करतात. त्यामुळे हे दोन्हींकडून संपायला पाहिजे. निखिल वागळेंनीही मर्यादित राहिलं पाहिजे आणि लोकांनीही आक्रमक होऊ नये.