Amruta Fadnavis in Pune: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. पुण्यावर देवेंद्र फडणवीसांचं लक्ष असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच, पुण्यातील अनेक समस्यांबाबत आपण देवेंद्रजींना सांगत असतो, असंही त्या भाषणादरम्यान म्हणाल्या आहेत. पुण्यातील समस्यांवर भाष्य करताना अमृता फडणीसांनी देवेंद्र फडणवीस पुण्याला आपलं मूल मानतात, असं विधान केल्यानंतर आता त्यांच्या या विधानांची चर्चा सुरू झाली आहे.
“मी देवेंद्रजींना पुण्यातील समस्या सांगत असते”
पुण्यात एका कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अमृता फडणवीस उपस्थित होत्या. या कार्यक्रमात केलेल्या भाषणादरम्यान अमृता फडणवीस यांनी आपण पुण्यातील समस्यांबाबत देवेंद्र फडणवीसांना सांगत असतो, असं नमूद केलं. “माझी आजीही पुण्यात राहते. मी जेव्हा इथे येते तेव्हा मला वाटतं मी माहेरी आले आहे. इथल्या लोकांबद्दल मला खूप आपुलकी वाटते. मी जेव्हा इथे येते तेव्हा इथे काय कमी आहे, काय सुधारता येईल हे सांगत असते. देवेंद्र फडणवीसांना कळतंच, पण मीही सांगते. मला आनंद आहे की तेही पुण्याकडे तेवढंच लक्ष देतात”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
देवेंद्रजी मुंबई-पुणे आपली मुलं असल्याचं मानतात – अमृता फडणवीस
दरम्यान, कार्यक्रमानंतर माध्यम प्रतिनिधींनी देवेंद्र फडणवीस पुण्याकडे एवढं लक्ष का देत आहेत? असा प्रश्न केला असता त्यावर अमृता फडणवीस यांनी उत्तर दिलं. “पुणे आपली सांस्कृतिक राजधानी आहे. पुणे हे देवेंद्र फडणवीसांचं एक बेबी आहे. मुंबई, पुणे, नागपूर ही आपलीच मुलं आहेत असं देवेंद्रजी मानतात. पुण्यातही खूप समस्या आहेत. इतकं वेगाने शहरीकरण झाल्यामुळे काही गोष्टींकडे अद्याप लक्ष गेलेलं नाही. मलाही अनेकदा लक्षात येतं की रस्ते अजून चांगले पाहिजेत, वाहतूक व्यवस्थित हवी. मेट्रोनंही खूप फरक पडला आहे. पण सामान्य माणूस जोपर्यंत सुखदायी आयुष्य जगत नाही, तोपर्यंत मला वाटत नाही देवेंद्रजी पुण्यातल्या त्यांच्या फेऱ्या कमी करतील”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
महिला अत्याचाराच्या घटनांवर प्रतिक्रिया
दरम्यान, महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान पुण्यात अमृता फडणवीसांच्या हस्ते करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत सविस्तर भूमिका मांडली. “अशा घटना वेदनादायी आहेत. एकीकडे आम्ही आधुनिक महिला म्हणून मोठ्या शहरांमध्ये पुढे येत आहोत. पण त्याच शहरांमध्ये किंवा छोट्या गावांमध्ये महिलांवर आजही अत्याचार होत आहेत. हुंडाबळी किंवा इतर कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. आपले राज्यकर्ते, पोलीस, न्यायपालिका यांच्याकडून महत्त्वाची भूमिका निभावली जाणं गरजेचं आहे. ही भूमिका ते निभावतही आहेत. पण दुसरीकडे प्रत्येक व्यक्तीला आत्मपरीक्षण करावं लागणार आहे. आपण पीडित महिलांना मदत करतोय का? आपल्या घरी महिलांचा सन्मान करायला हवा हे मुलांना शिकवत आहोत का? अशा गोष्टींमुळेच खूप मोठा फरक पडणार आहे”, असं अमृता फडणवीस यांनी नमूद केलं.
लाडकी बहीण योजना बंद होणार?
दरम्यान, राज्याची आर्थिक स्थिती पाहता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ बंद होणार असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. यावरही अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “काही लाडक्या बहिणी पात्र नव्हत्या. फक्त त्यांना वगळण्यात आलं आहे. मला वाटतं ही योजना चालू राहील. आपल्या अर्थसंकल्पावर ताण पडतोच. पण बहिणींसाठी तो ताण सहन करून राज्य सरकार ही योजना चालू ठेवेल”, असा विश्वास अमृता फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
राज ठाकरे – उद्धव ठाकरे एकत्र येणार?
ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्यासंदर्भात सध्या महाराष्ट्रात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. यावरही अमृता फडणवीस यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. “ते एकत्र येत असतील तर त्यात आनंद आहे. जिवलग नाती तुटल्यानंतर परत एकत्र येतात ही चांगली गोष्ट आहे. काही अजेंडा असो वा नसो, पण कुटुंबासाठी एकत्र राहणं कधीही चांगलं”, असं त्या म्हणाल्या.