Amruta Fadnavis महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि समाजसेविका अमृता फडणवीस यांनी ट्रोलर्सबाबत पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. मला जे कुणी ट्रोल करतात त्यांचा मला काही फरक पडत नाही. मला ठाऊक आहे की मी कशा प्रकारे वागते, कशी वावरते. इतर राजकीय नेत्यांच्या पत्नींच्या तुलनेत मी वेगळी आहे. पारंपरिक असण्याला माझा काही विरोध नाही. मात्र मला जसं आवडतं तशी मी राहते असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. तसंच त्यांनी ट्रोल करणाऱ्यांनाही खडे बोल सुनावले आहेत.
गणेश उत्सवानंतर अमृता फडणवीस का झाल्या ट्रोल?
गणेश उत्सव झाल्यानंतर म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी अमृता फडणवीस जुहू येथील समुद्र किनाऱ्यावर स्वच्छतेसाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या बरोबर असलेली त्यांची टीम आणि अभिनेता अक्षय कुमारही त्यांच्या बरोबर होते. गणपती विसर्जनाच्या दिवशी जे निर्माल्य साठलं होतं ते निर्माल्य आणि समुद्रातून बाहेर आलेल्या मूर्ती हटवून जुहू चौपाटी स्वच्छ करण्याची मोहीम त्यांनी राबवली होती. त्यावेळी अमृता फडणवीस यांनी ज्या प्रकारचा पोशाख परिधान केला होता त्यावरुन त्यांना ट्रोल करण्यात आलं. याबाबत अमृता फडणवीस यांना इंडिया टुडे कॉनक्लेव्ह मध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अमृता फडणवीस यांनी मला ट्रोलर्समुळे काही फरक पडत नाही असं म्हटलं आहे.
ट्रोलर्स बाबत काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
अमृता फडणवीस म्हणाल्या “असे अनेक प्रसंग घडले आहेत की सोशल मीडियावर लोक माझ्याबाबत ओव्हर रिअॅक्ट करतात. अशा गोष्टी समोर आणून ते मुख्य मुद्द्यापासून बाजूला होतात, फारकत घेतात. मी गणेश उत्सवानंतर म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी स्वच्छता मोहिम राबवली. समाजातले काही घटक, एनजीओ आणि लहान मुलांची साथही आम्हाला लाभली. पर्यावरण पूरक गणपती मूर्ती घरी आणा यासाठीही आम्ही लोकांना संदेश दिला. मात्र ट्रोलर्सनी हा विषय बाजूला ठेवला आणि मी कसे कपडे घातले आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं मुख्य विषय काय होता तो लक्षात घेतला पाहिजे. मला ट्रोलर्समुळे काही फरक पडत नाही मला ठाऊक आहे त्यांना याचे पैसे मिळतात. त्यामुळे हे ट्रोलर्स अशा पद्धतीने व्यक्त होतात.”
ज्या महिलेकडे स्वतःचा आवाज आहे तिला ट्रोल केलं जातंच
एक महिला जी व्यवस्थित विचार करु शकते, समस्या समजून घेऊ शकते जिच्याकडे तिचा आवाज आहे, तिचं म्हणणं आहे तिला ट्रोल करायला ट्रोलर्स सरसावणारच. हे फक्त माझ्याबाबतीत नाही प्रत्येक महिलेला लागू पडतं. आज समाजात अनेक महिला आहेत ज्यांच्याकडे आपला आवाज आहे. जेव्हा तुमच्याकडे तुमचा आवाज असतो तेव्हा तुमच्या विरोधातही एक आवाज तयार होतो. मला हे ट्रोलर्स पार्श्वसंगीताप्रमाणे वाटतात. तुम्ही ते कर्कश्य आहे समजून त्रास करुन घ्यायचा की त्यावर नाच करत ठेका धरायचा हे तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्ही त्यांना टाळणं हा चांगला पर्याय आहे, शिवाय तुम्ही त्यांच्या विरोधात आवाजही उठवू शकता. काय करायचं हा शेवटी तुमचा निर्णय असला पाहिजे असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
खासगी आयुष्यावर ट्रोलिंगचा परिणाम होतो?
खासगी आयुष्यावर ट्रोलिंगचा परिणाम होतो का? हे विचारलं असता अमृता फडणवीस म्हणाल्या मी आणि देवेंद्र फडणवीस जेव्हा रात्री जेवणाच्या टेबलवर एकत्र येतो तेव्हा आम्ही सगळ्या गोष्टींबाबत चर्चा करतो. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की देवेंद्र फडणवीस हे असे व्यक्ती आहेत ज्यांना महिला सशक्तीकरणावर विश्वास आहे ते यासाठी कामही करत आहेत. तसंच मी माझ्या सासरच्या मंडळींचे आणि माझ्या आई वडिलांचेही आभार मानते कारण कारण आम्हाला आमची स्पेस त्यांनी दिली आहे. आम्ही दोघंही म्हणजेच मी आणि देवेंद्रजी एकमेकांच्या विचारांचा आदर करतो. कुठलीही घटना घडली तर मला देवेंद्रजींना स्पष्टीकरण देण्याची गरज पडत नाही. असंही अमृता फडणवीस यांनी सांगितलं.