सोलापूर : गावाकडे जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत थांबलेल्या एका वृद्ध महिलेला मोटारीत बसवून नेताना पुढे काही अंतरावर तिच्या डोळ्यांत चटणी टाकून आणि मारहाण करून तिच्या अंगावरील साडेतीन तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड असा दोन लाख दहा हजार रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने लुटण्याचा प्रकार सोलापूर-पुणे महामार्गावर टेंभुर्णी येथे दिवसाढवळ्या घडला.

शकुंतला शिवाजी देवकर (वय ६५, रा. खांडवी, ता. बार्शी) यांनी याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, एका महिलेसह दोघांनी त्यांना लुटले आहे. शकुंतला देवकर दुपारी बाराच्या सुमारास टेंभुर्णी येथे बाह्यवळण रस्त्यावर गावाकडे जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत थांबल्या होत्या. तेव्हा एका मोटारीतील महिलेसह दोघांनी त्यांची विचारपूस केली आणि त्यांना गावाच्या दिशेने घेऊन जातो, अशी थाप मारत मोटारीत बसविले. काही अंतरावर त्या महिलेसह दोघांनी शकुंतला यांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांना मारहाण केली. भीती दाखवून त्यांच्या अंगावरील गंठण, बोरमाळ, कर्णफुले आदी मिळून साडेतीन तोळे सोन्याचे दागिने, ५० हजारांची रोकड आणि भ्रमणध्वनी संच असा ऐवज बळजबरीने लुटला. पोलिसांनी लुटलेल्या मालाची किंमत दोन लाख ९५०० रुपये एवढी दर्शविली आहे.

दुसऱ्या एका घटनेत करमाळा तालुक्यातील आवाटी येथे दत्तात्रय दगडू मोरे (वय २४, रा. पोटेगाव, ता. करमाळा) या तरुणाला दोघा दुचाकीस्वारांनी अडवून पिस्तुलाचा धाक दाखविला आणि दहशत निर्माण करून त्याच्याजवळील दोन तोळे सोन्याचे दागिने लुटून नेले. हा प्रकार सुद्धा दिवसाढवळ्या घडला. करमाळा पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे.