नांदेड: १९७५च्या आणीबाणी पर्वात वृत्तपत्रांच्या विचार आणि लेखनस्वातंत्र्याची गळचेपी झालेली असतानाही या कालखंडात निर्भीड पत्रकारितेचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या ‘मराठवाडा’ वृत्तपत्रातील गोपाळ साक्रीकर, निळू दामले आणि अरविंद गं. वैद्य या तीन ज्येष्ठ पत्रकारांना येत्या ९ नोव्हेंबर रोजी अनंत भालेराव प्रतिष्ठानातर्फे गौरविण्यात येणार आहे.
‘मराठवाडा’ दैनिकाचे माजी संपादक (कै.) अनंतराव भालेराव यांनी सत्याग्रह करून आणीबाणीविरोधात निषेध नोंदविला होता. नंतर त्यांना ‘मिसा’खाली अटक करून ११ महिने कारागृहात पाठविण्यात आले होते. आणीबाणीला जून महिन्यात ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अनंतरावांच्या अनुपस्थितीत कठीण आणि कसोटीच्या काळात दैनिकाच्या संपादकीय विभागाची जबाबदारी त्यांच्या वरील तीन आणि अन्य सहकाऱ्यांनी अत्यंत समर्थपणे सांभाळली होती. त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात साक्रीकर, दामले आणि वैद्य यांचा सन्मान केला जाणार आहे.
भालेराव प्रतिष्ठानातर्फे साहित्य, पत्रकारिता, संस्कृती-कला व सामाजिक कार्य इ. क्षेत्रांतील एका व्यक्तीस दर वर्षी अनंतरावांच्या स्मरणार्थ पुरस्कार दिला जातो. यंदापुरता पुरस्काराच्या स्वरूपात थोडा बदल करण्यात आला असून, प्रतिष्ठानाशी निगडित काही मान्यवरांच्या सूचनेवर विचार करून वरील तीन पत्रकारांना संयुक्तपणे गौरविण्याचे प्रतिष्ठानाने निश्चित केले आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या गौरवाचे स्वरूप आहे.
येत्या ९ नोव्हेंबर (रविवार) रोजी छत्रपती संभाजीनगरमधील स. भु. शिक्षण संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीच्या नाट्यगृहात न्यायमूर्ती (नि.) सुनील देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात वरील तिघांच्या सन्मानासोबतच साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ हे प्रमुख पाहुणे या नात्याने ‘आणीबाणी : काल, आज आणि उद्याची’ या विषयावर बोलणार आहेत.
वरील कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानातर्फे डॉ. मंगेश पानट, संजीव कुळकर्णी, हेमंत मिरखेलकर, राधाकृष्ण मुळी आणि डॉ. अजित भागवत यांनी केले आहे.
