अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आमदार रमेश लटके यांच्या मृत्यूनंतर याठिकाणी पोटनिवडणूक पार पडत आहे. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. आज त्या आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मागील काही दिवसांपासून मुंबई महापालिका त्यांचा राजीनामा स्वीकारत नव्हती, त्यामुळे ऋतुजा लटके निवडणूक लढवणार की नाही? याबाबत संदिग्धता निर्माण झाली होती.

आज अखेर महापालिकेनं त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ऋतुजा लटके आज अर्ज भरायला गेल्यानंतर त्यांचे सासरे व दिवंगत आमदार रमेश लटके यांचे वडील कोंदिराम लटके यांना अश्रू अनावर झाले आहेत.

ऋतुजा लटके या रमेश लटके यांच्या नावासाठी उभ्या आहेत, पैशांसाठी नाही. त्यांना जनतेनं उभं केलं आहे. आता सर्वकाही जनतेच्या हातात आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्ती केली आहे. ही प्रतिक्रिया देताना कोंदिराम लटके यांना अश्रू अनावर झाले आणि हातही थरथरले. अशा स्थितीतही त्यांनी आपल्या भावनांना आवर घालत ऋतुजा लटके आपल्या पतीप्रमाणे एकदम चांगल्या प्रकारे काम करून दाखवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हेही वाचा- ठाकरे गटाला मोठा दिलासा! न्यायालयाच्या दणक्यानंतर BMC ने स्वीकारला लटकेंचा राजीनामा; पाहा स्वीकृती पत्रात काय म्हटलंय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ऋतुजा लटके ज्याच्या नावासाठी उभ्या आहेत. जनतेनंच त्यांना उभं केलं आहे. आता सगळं जनतेच्या हातात आहे. त्यामुळे पुढे काय करायचं, ते तुम्ही बघा. त्या रमेश लटके यांच्याप्रमाणेच एकदम डायरेक्ट काम करणार… त्याचा हिशोबच नाही. तिच्या पतीने जनतेसाठी जे काही केलं, ते तिनेही करावं” अशा भावना कोंदिराम लटके यांनी व्यक्त केल्या आहेत.