केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणणल्याने बाजारपेठेत कांद्याचे दर पडले आहे. याचे पडसाद कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये सोमवारी उमटले. कांद्याचे भाव घसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लासलगावमध्ये लिलाव बंद पाडला. तसेच निफाडमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको सुरू केला आहे.

देशातील कांद्याच्या वाढत्या दराना लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय रविवारी जारी केला. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात पत्रक जारी केले होते. कांद्याच्या निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ लागू केला असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले होते. त्यानंतर या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना असल्याचे बोलले जात होते. त्यांचे परिणाम सोमवारीच दिसून आले आहेत.

आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये कांद्याचे दर घसरले आहे. सोमवारी सकाळी कांद्याचे लिलाव सुरू झाले. पाच ट्रॅक्टरचे लिलाव झाल्यानंतर शेतकरी कांद्याच्या दरावरून आक्रमक झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. दरम्यान, केंद्राच्या निर्णयाविरोधात निफाडमध्ये रास्ता रोको सुरू केला आहे.

सरकारच्या निर्णयावर टीका करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले,”आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील काद्यांचे भाव आणि देशातील भाव बघितले तर कांदा निर्यात होणं शक्य नाही. अशा स्थितीत सरकारने हा निर्णय कसा घेतला. हे सरकार शेतकऱ्याला मातीत घालायला निघालं आहे.”