संगमनेर : कांद्याला अवघा १८० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी संगमनेर-लोणी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात कांदे ओतून अनोखे आंदोलन केले. एकीकडे शेतमालाला बाजार भाव नाही आणि दुसरीकडे रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करायला सरकारकडे पैसे नाही, म्हणून कांद्याने खड्डे भरून रस्ता सपाट केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे होते.
संगमनेर तालुका कृषी उत्पन्न समितीच्या वडगावपान उपबाजारामध्ये आज शेतकऱ्यांनी अनेक ट्रॅक्टर भरून कांदे आणले होते. परंतु, तेथे कांद्याला अवघा १८० रुपये प्रति क्विंटल दर निघाला. कांद्याचा एकूण उत्पादन खर्च आणि मिळणारा भाव याचा कुठेच ताळमेळ लागत नसल्याने शेतकरी संतापले. त्यातच या मार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे येथील गावकरी, शेतकरी अगोदरच त्रस्त होते.
वारंवार लेखी मागणी करूनही साधा मुरूम सुद्धा खड्ड्यात टाकला जात नव्हता. त्यामुळेच शेतकऱ्यांनी प्रतीकात्मक ५ ट्रॅक्टरमधील कांदे या खड्ड्यात ओतून खड्डे भरण्याचे आंदोलन केले. बाबा ओहोळ, बाळासाहेब गायकवाड, गणेश गडगे, आबासाहेब थोरात, विक्रम ओहोळ, प्रशांत थोरात, कैलास थोरात, बाबासाहेब थोरात, मनोज थोरात, नीलेश थोरात, संभाजी थोरात, मंगेश थोरात, अजय थोरात यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी होते.
सध्याचे केंद्र व राज्य सरकार हे भांडवलदार आणि श्रीमंतांचे सरकार आहे. या सरकारला शेतकरी आणि गोरगरिबांचे कोणतेही घेणे देणे नाही, असे आरोप करत सरकारच्या निषेधाच्या घोषणा यावेळी शेतकऱ्यांनी दिल्या. पंचायत समितीचे माजी उपसभापती गायकवाड म्हणाले की, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा करून सत्तेत आलेल्या या सरकारने आमची घोर फसवणूक केली आहे. शेतीमालाला हमीभाव देण्याचे आश्वासनही पाळण्यात आले नाही. उलट आज १८० रुपये क्विंटल अशा कांद्याला भाव दिला ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. लेखी मागणी करूनही रस्त्यावरील खड्डे बुजवले जात नाहीत, म्हणून हेच कांदे टाकून खड्डे बुजवण्याचे आंदोलन केले.
