माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते असं वक्तव्य करुन अंधश्रद्धा पसरवणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरोधात कारवाई करण्यासाची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य प्रधान सचिव मिलींद देशमुख यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरुन त्यांच्या समर्थकांना ते आपल्याला कोणत्या युगात नेत आहेत हे पहावं असंही त्यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले आहेत संभाजी भिडे
माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते असं अजब वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. आपल्या शेतातील आंबे खाल्ल्याने जवळपास 150 जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. नाशिकमधील एका सभेत ते बोलत होते.

“लग्न होऊन १५ वर्ष झालेल्यांनाही मुलं होतं नाहीत. अशा स्त्री, पुरुषांनी ही फळं खाल्ल्यास त्यांनी निश्चित मुलं होतील. मी आतापर्यंत १८० हून जास्त जणांना तसंच जोडप्यांना हे फळ खायला दिलं असून १५० पेक्षा जास्त जणांना मुलं झाली आहेत”, असं विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल असाही दावा त्यांनी केला आहे.

ही गोष्ट आपण फक्त आपल्या आईला सांगितली असून आता तुम्हाला सांगत आहोत असं त्यांनी यावेळी सांगितलं. संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर टीका होण्यास सुरुवात झाली असून अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anis demand action against sambhaji bhide
First published on: 11-06-2018 at 14:19 IST